पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळास सहा महिने मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता वाढता संसर्ग टाळण्यासाठी महसूल व वन विभागाच्या ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्याच्या लॉकडाऊन कालावधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीच्या रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार आहे.

पारोळा ः येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १८ सप्टेंबरला संपुष्टात येणार आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास पुढील मुदतवाढ मिळणेसाठी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगांव यांनी शासनास सादर केला होता. त्‍यास मंजुरी मिळाली आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता वाढता संसर्ग टाळण्यासाठी महसूल व वन विभागाच्या ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्याच्या लॉकडाऊन कालावधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीच्या रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार आहे. या परिस्थितीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही असे प्रस्तावाद्वारे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांच्याकडून शासनास सांगण्यात आले. यावर वरील सर्व बाबी लक्षात घेता बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देणे योग्य असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्याआधारे महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १४ (३) शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून पारोळा कृषि उपन्न बाजार समिती या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास दिनांक १९ सप्टेंबरपासून पुढील सहा महिने म्हणजेच १८ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. १० सप्टेंबर २०२० रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मुदतवाढी बद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola krushi bajar samiti body six month extension