रसवंतीच्या चाकाचे घुंगरु जड...ऊस झाला पशुधनाचा चारा 

संजय पाटील
रविवार, 12 जुलै 2020

राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबवून हळूहळू आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. महामार्गावरील दुकाने सुरू करण्याची मुभा दिली गेली. यात रसवंतीचालकांनी देखील हंगामाच्या अखेरीस का होईना व्यावसाय सुरू केला.

पारोळा (जळगाव)  : मागील वर्षाप्रमाणे यंदाही लग्नसराई व उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे ऊसाची रसवंती चालेल या अपेक्षेने शहरासह तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे रसवंती चालकांनी लाखो रुपयांचा ऊस खरेदी करुन ठेवला. परिणामी, मार्चमध्येच ‘कोरोना’चा प्रादुर्भावामुळे ताळेबंदी जाहीर झाली. लग्नसराईसह उन्हाळ्याची चारही महिने ताळेबंदीत गेली. त्यामुळे रसवंती चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरेदी केलेला ऊस अक्षरश: पशुधनासाठी चारा म्हणून विकण्याची वेळ रसवंतीचालकांवर आली आहे. 

राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबवून हळूहळू आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. महामार्गावरील दुकाने सुरू करण्याची मुभा दिली गेली. यात रसवंतीचालकांनी देखील हंगामाच्या अखेरीस का होईना व्यावसाय सुरू केला. परंतु तरी देखील नागरिक ऊसाचा गोडवा चाखायला फिरकत नसल्याची खंत बालाजी रसवंतीचे संचालक योगेश तुकाराम चौधरी यांनी व्यक्त केली. 
 
आर्थिक मदतीची अपेक्षा 
केंद्र सरकारने नुकतीच प्रधामंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली. यात फेरीवाले विक्रेत्यांसाठी खास खेळते भांडवल सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेत रसवंतीचालकांना समाविष्ट करुन त्यांना देखील खेळते भांडवल म्हणून ५० हजाराची मदत द्यावी, जेणेकरुन या पैशात ते जोड व्यवसाय करुन कुटुंब भागवतील. शासनाने मदत द्यावी, अशी मागणी रसवंतीचालकांनी केली आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola lockdown Cane Raswanti no bissnes