साखर संघांनी गुडघे टेकून भगवान गडावर यावे ः आमदार सुरेश धस

संजय पाटील
Saturday, 26 September 2020

जोपर्यंत ऊस तोड कामगारांच्या मुकडदम यांच्याबाबत कायदेशीर अधिष्ठान लागू केले जात नाही. कमिशन ३७ टक्के व पगार वाढीत टक्केवारी वाढविली जाणार नाही; तोवर साखर संघाशी चर्चा करणार नाही.

पारोळा (जळगाव) : जोपर्यंत ऊस तोड कामगारांच्या मुकडदम यांच्याबाबत कायदेशीर अधिष्ठान लागू केले जात नाही. कमिशन ३७ टक्के व पगार वाढीत टक्केवारी वाढविली जाणार नाही; तोवर साखर संघाशी चर्चा करणार नाही. राज्यातील सर्व ऊस तोड कामगार व मुकडदम यांच्या पाठीशी राहणार असून मागण्या मान्य असतील तर साखर संघाने गुडघे टेकून भगवान गडावर चर्चेसाठी यावे; आम्ही त्यांचे स्वागत करू असे मत आमदार सुरेश धस यांनी पारोळा येथील मूकडदमयांच्या मेळाव्या प्रसंगी व्यक्त केले.

पारोळा येथे झालेल्‍या मेळाव्यास खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, श्रमिक संघटनेचे विष्णू पंत, राज्य उस उत्पादक संघटनेचे सचिव सुकदेव सानप, सचिन पानपाटील, नगरसेवक बापू महाजन, मनीष पाटील, नवल सोनवणे यांच्यासह एरंडोल- पारोळा तालुक्यातील उसतोड कामगार व मुकडदम उपस्थित होते. 

आमदार सुरेश धस यांनी मुकडदमाना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी हा लढा असून कारखानदार गुंडांना सुपारी देवून पोलिसांना हफ्ते देऊन पैसे वसूल करत आहे. हे जळगाव जिल्ह्यात सर्रास सुरु असून ५ टक्क्याचे पैसे वापरणाऱ्या मुकडदमाचे शोषण सुरु आहे. डबल पैशांची वसुली केली जात आहेत. तक्रारी देऊनही कारवाई केली जात नाही. पारोळा तालुक्यात अनेक या विषयाच्या अपहरणाच्या केसेस दाखल होवुनही तपास केला जात नाही. पश्चिम महाराष्ट्र व गुजरात राज्यातील कारखानदार गुंडगिरी पोसत असून एकीकडे समान काम समान वेतन कायदा असताना त्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे जोवर संप सुरु आहे; तोवर मजुरांनी उसतोडसाठी जाऊ नका, गाड्या भरू नका शेतीची कामे करा कारखानदार यांच्या षडयंत्राला बळी पडू नका असे आवाहन त्‍यांनी केले.

सत्‍ताधारी केवळ फेसबुक, व्टिटरवर ः खासदार पाटील
खासदार उन्मेष पाटील यांनी मत मांडताना आता कोणतीही निवडणूक नसताना आमदार धस हे या विषयावर राज्यभर फिरत असून सत्ताधारी फक्त फेसबुक आणि ट्वीटर दिसत असल्याची टीका केली. या वर्गाचे गंभीर प्रश्न असून आपण पुढील अधिवेशनात याबाबत दिल्ली दरबारी हा विषय लावून धरू असे आश्वासन दिले. तर आमदार भोळे यांनी देखील राज्य सरकारवर टीकास्र सोडत सरकारला जनतेशी घेणे देणे नसून विरोधी पक्ष नेता कोरोना काळात राज्य भर फिरत आहे. पण मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ मात्र घरी बसून गंमत बघत असल्याची टीका केली. उसतोड कामगार क्षेत्रात सर्वात जास्त वंजारा समाज कार्यरत असून या कष्टकरी समाजाचे प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola mla suresh dhas melava ustod worker