दिलासादायक : बोरी धरणाच्या जल पातळीत एक मीटरने वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

धरणाचा एकूण प्रकल्पित साठा हा ४०. ३१ दलघमी एवढा आहे. मागील वर्षी बोरी धरण हे शंभर टक्के भरले होते. यामुळे डाव्या व उजव्या कालव्यांना नियमित आवर्तने देऊन देखील पाणीसाठा शिल्लक होता. 

पारोळा : गेल्या दोन ते तीन दिवसापासून आर्वी व विंचूर परिसरातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे बोरी धरणाच्या पाणी पातळीत एक मीटरने वाढ झाली आहे, अशी माहिती अभियांत्रिकी सांख्यिक प्रमुख व्ही. एम. पाटील, शाखा अधिकारी पी. जे. काकडे यांनी दिली. परिणामी पहिल्याच पावसात पाणी पातळी वाढल्याने समाधान व्यक्‍त होत आहे. 
१५ जूनला बोरी धरणाचा पाणीसाठा १८. २०० दलघमी व २६३. ६७९ मीटर एवढा होता. मात्र, १८ जूनला २३. ४०६ दलघमी व २७४. ७०० मीटर असल्याने जवळजवळ एक मीटर पाण्याची पातळी वाढली असून, सध्यस्थितीत ३२. ७९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. धरणाचा एकूण प्रकल्पित साठा हा ४०. ३१ दलघमी एवढा आहे. मागील वर्षी बोरी धरण हे शंभर टक्के भरले होते. यामुळे डाव्या व उजव्या कालव्यांना नियमित आवर्तने देऊन देखील पाणीसाठा शिल्लक होता. 
पहिल्या पावसानेच शेतकरी कामाला लागले आहेत. पेरणीची कामे पूर्णत्वास आली असून, यंदा कापूस पिकाचीच लागवड जास्त प्रमाणात आहे. त्या खालोखाल मका, ज्वारी, बाजरी आदींची लागवड करण्यात आली आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडणार असल्याचा अंदाजाने शेतकऱ्यांना खरिपाची आशा लागून आहे. तामसवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी सोडले जाते. हे पाणी सोडल्यानंतर याचा लाभ अमळनेर व पारोळा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होत असतो. 

बोरी धरण वरदान 
पारोळा तालुका हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडला जातो. तत्कालीन आमदार (स्व.) भास्करराव पाटील यांच्या प्रयत्नाने बोरी धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे बोरी धरण हे तालुक्यासाठी वरदान ठरले असल्याचे तामसवाडीचे माजी सरपंच हिरामण पवार यांनी सांगितले. दरम्यान बोरी धरणातील सोडले जाणारे पाणी हे नदीतून विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola one miter water lavel up bori dam