पोलिस कर्मचारी कर्तव्यावर; चोरट्यांचा घरात केला हात साफ

संजय पाटील
Thursday, 15 October 2020

ओमनगरातील मयुर महाजन यांनी योगेश महाजन यांना फोन करुन घराच्या लोखंडी कळीकोंडा तुटलेला असल्‍याचे सांगितली. यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील बेडरुममधील सामान अस्ताव्यस्‍त पडलेले दिसले. लागलीच भावास घटनेची माहिती दिली. 

पारोळा (जळगाव) : शहरातील ओमनगर भागात दोन पोलिसांच्या बंद असलेल्या घराचा फायदा घेत ता,15 पहाटेच्या सुमारास कडीकोंडा तोडुन घरातील 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांन लांबविल्याने एकच खळबळ उडाली.
याबाबत प्राथमिक शिक्षक सतीष गंगाराम महाजन यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यांचे भाऊ योगेश महाजन हे ठाणे पोलिस दलात कार्यरत असुन त्यांचे कुटुंब पत्नी मेघा महाजन, मुलगी दिप्ती व मुलगा रोहित हे पारोळा येथील ओमनगर भागात राहतात. बुधवारी (ता.१४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मेघा महाजन या अमळनेर येथे माहेरी वडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्‍यचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून रक्‍कम लांबविली. याबाबत आज पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ओमनगरातील मयुर महाजन यांनी योगेश महाजन यांना फोन करुन घराच्या लोखंडी कळीकोंडा तुटलेला असल्‍याचे सांगितली. यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील बेडरुममधील सामान अस्ताव्यस्‍त पडलेले दिसले. लागलीच भावास घटनेची माहिती दिली. 

सोन्याची पोत, साखळ्या चोरीला
घरातील पाहणी केली असता येथील 33 हजार रुपये किमतीची तीन तोळे सोन्याची मंगलपोत, २८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व साडेचार हजार रुपये किमतीच्या दहा भार वजनाच्या चांदीच्या पायातील साखळ्या असा एकुण ६५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. 

पोलिसांचा रहिवास तरीही
याच परिसरात राहणारे आधार शिवराम बिऱ्हाडे पोलिस कर्मचारी यांच्या देखील बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष करुन त्या घरातुन देखील मुद्देमाल गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच याच परिसरात उपोनि निलेश गायकवाड तसेच काही पोलिस कर्मचारी यांचा रहीवास असतांना चोरट्यांनी खाकी वर्दीलाच लक्ष केल्याने पारोळा पोलिसांसमोर सदर चोरीबाबत मोठे आवाहन उभे राहीले आहे.याबाबत पारोळा पोलिसांकडुन श्वान पथकाची मदत घेवुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात अज्ञात चोरटे हे मोटार सायकलवर आल्याचे दिसुन येत होते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola police home robbery golden chain and jewellery