धरण पाहण्याचे निमित्‍त...पोहण्यासाठी उतरले ते वर आलेच नाही

संजय पाटील
Sunday, 26 July 2020

पोहण्यासाठी पाण्यात उतरले असताना ते अंदाज न आल्‍याने खाली बुडाले. दरम्‍यान अन्य पोहणाऱ्यांनी त्‍यांना वाचविण्याचा प्रयत्‍न केला मात्र तो यशस्‍वी होवू शकला नाही. सदरची घटना दुपारी तीन वाजता घडली असून, त्‍यांचा शोध घेणे सुरूच आहे.

पारोळा : तामसवाडी धरण परिसरात पाऊस झाल्‍याने धरण शंभर टक्‍के भरले आहे. यात कोरोनाच्या काळात घरी आलेल्‍या मुलांना सोबत घेवून धरण पाहण्यासाठी गेले. धरणाच्या गेटसमोरील मोकळ्या पाण्यात इतरांना पोहताना पाहून त्‍यांनाही पोहण्याचा मोह आवरला गेला नाही. पोहण्यासाठी म्‍हणून ते खाली उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्‍याने खाली बुडाले ते वर आलेच नाही. वडील पाण्यात बुडत असल्‍याचे दृश्‍य मुले नुसते पाहतच राहिली. 

पारोळा येथील विद्यानगर परिसरात राहणारे प्रवीण प्रभाकर जडे (वय 55) असे पाण्यात बुडालेल्‍या इसमाचे नाव आहे. जडे हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असताना ते अंदाज न आल्‍याने खाली बुडाले. दरम्‍यान अन्य पोहणाऱ्यांनी त्‍यांना वाचविण्याचा प्रयत्‍न केला मात्र तो यशस्‍वी होवू शकला नाही. सदरची घटना दुपारी तीन वाजता घडली असून, त्‍यांचा शोध घेणे सुरूच आहे.

धरणाचा फोटो पाहून प्रत्‍यक्ष पाहण्याचा मोह
मालेगाव, आर्वी, शिरूड, बोरकुंड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात येऊन ते शंभर टक्के भरले होते. यामुळे धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आल्याने बोरी काठावरील सर्व नदी- नाले तुडुंब वाहत होती. पाण्याने भरलेल्‍या धरणाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्याने नागरिकांना याचे आकर्षण होते. त्‍यानुसार जडे यांना देखील धरण प्रत्‍यक्ष पाहण्यास मोह आवरला गेला नाही. म्‍हणून प्रवीण जडे हे दोन्ही मुले ऋषिकेश व अक्षय ही दोन्ही मुले कोरोनामूळे घरी आले असल्‍याने त्‍यांना सोबत घेवून दुपारी एकच्या धरण बघण्यासाठी गेले होते. 

पोहण्याचा आनंद ठरला अखेरचा
अनेक नागरिक धरण परिसरात फिरण्यासाठी येत होते. तर काहींनी धरणाच्या गेट समोरील मोकळ्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होते. यावेळी त्या भागात पाणी जास्त झाल्याने प्रवीण जडे हे देखील पोहण्यासाठी उतरले. यावेळी परिसरात सात हजार क्यूसेस पाणी होते. जडे यांना पोहता येत असताना ते अति खोल भागात गेल्याने अचानक बुडू लागले. त्‍यांनी वाचविण्यासाठी आरडाओरड केली असता त्यांच्या मुलासह काही ग्रामस्थांनी दोर फेकून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दोर न पोहचल्याने प्रवीण जडे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यानंतर त्यांना शोधण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु सायंकाळपर्यंत ते आढळून आले नाही. 

जडेंच्या शोधासाठी दरवाजे बंदच्या सुचना
दरम्यान प्रवीण जडे यांना शोधण्यासाठी धरणाचे सर्व गेट बंद करण्याच्या सूचना माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लघु पाटबंधारे विभागास दिल्‍या. यानंतर एक ते दीड तास सदर दरवाजे बंद करण्यात आले होते. परंतु धरणाची पातळी वाढत असल्याने अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास दरवाजे पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे अभियंता व्ही. एम. पाटील यांनी दिली. त्यामुळे प्रवीण जडे यांना शोध घेण्यात मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola tamaswadi dam water one man death