esakal | महिन्याआधीच केळीची निर्यात; वीस हजार टनचे उद्दीष्‍ट
sakal

बोलून बातमी शोधा

banana exports

निर्यातक्षम केळी उत्पादन याविषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आणि जिल्ह्यातील केळीबागांच्या निर्यातीसाठी पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी संवाद साधला.

महिन्याआधीच केळीची निर्यात; वीस हजार टनचे उद्दीष्‍ट

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर (जळगाव) : या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा थंडीचे प्रमाण कमी असल्याने व कापणीयोग्य केळीचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने केळी निर्यातीला किमान एक महिना आधी सुरवात झाली आहे. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा किमान दुप्पट म्हणजे सुमारे दोन हजार कंटेनर केळी निर्यातीचे उद्दिष्ट खासगी निर्यातदार कंपन्या आणि शेतकऱ्यांनी ठेवले आहे. 
दुबई, सौदी अरेबिया, इराण आदी देशांत केळी निर्यात करणाऱ्या देसाई या कंपनीचे महाराष्ट्र प्रभारी नरेश चौधरी यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. तालुक्यातील अटवाडा येथे निर्यातक्षम केळी उत्पादन याविषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आणि जिल्ह्यातील केळीबागांच्या निर्यातीसाठी पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. श्री. चौधरी म्हणाले, की गेल्या वर्षी भारतातून एक लाख ४० हजार टन केळी विदेशात निर्यात करण्यात आली. त्यापैकी जवळपास निम्मा म्हणजे ६५ हजार टन केळी निर्यातीचा वाटा देसाई कंपनीचा होता. या वर्षी आपल्या कंपनीतर्फे एक लाख टन केळीनिर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातून जास्त केळी निर्यात होत असल्याचे सांगून श्री. चौधरी म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यात जळगावच्या तुलनेत मर्यादित केळी लागवड होत असल्याने तेथील शेतकरी केळीची अधिक काळजी घेतात आणि निर्यातक्षम उत्पादन करतात. जळगाव जिल्ह्यातून यंदा सुमारे एक हजार कंटेनर म्हणजे सुमारे २० हजार टन केळी निर्यातीचे आमचे उद्दिष्ट आहे. विदेशातून वर्षभरच केळीची मागणी होत असते. मात्र, उत्कृष्ट दर्जाची केळी असावी ही त्यांची अट असते. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन करण्याबरोबरच दर्जेदार, निर्यातक्षम उत्पादन करण्यावर भर दिला, तर येथील निर्यात वाढू शकेल. 

रोज दोनशे क्‍विंटलची निर्यात
चीनमध्ये केळीची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र त्यांनाही अधिक दर्जेदार केळी हवी असते. चीनची बाजारपेठ भारतीय केळीला मिळाल्यास देशातील केळी निर्यातीचे प्रमाण वाढू शकेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दहा दिवसांपासून तालुक्यातून रोज एक कंटेनर म्हणजे दोनशे क्विंटल केळीची निर्यात होते. अटवाडा येथील रुची बनाना एक्स्पोर्ट्स आणि तांदळवाडी येथील महाजन बनाना एक्स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही केळी निर्यात होत आहे. आगामी काळात थंडी फारशी वाढल्यास निर्यात सुरू राहील. सध्या स्थानिक मजुरांकडूनच निर्यात केल्या जाणाऱ्या केळीची कापणी सुरू आहे. जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून केळी कापणी करणारे मजूर जानेवारीच्या मध्यानंतर येतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर केळी निर्यातीला अधिक गती मिळू शकेल. 
 
यंदा पोषक वातावरण 
गेल्या वर्षी कोरोनामुळे बंगाली मजुरांची उपलब्धता उशिरा झाली आणि लॉकडाउनमुळे बाजारपेठ उपलब्ध नव्हती. त्यामुळे उद्दिष्टाच्या निम्मीच केळी निर्यात होऊ शकली आणि केळीला नगण्य भाव मिळाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी मात्र सर्व स्थिती अनुकूल असल्यामुळे निर्यातदार, केळी उत्पादक, शेतकरी उत्साहात आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे