शेतकरी, व्यापाऱ्यांना हवी केळी वाहतूक दरात ५० टक्के सवलत !

प्रदीप वैद्य   
Thursday, 17 September 2020

रेल्वेने केळी पाठवायचे झाल्यास केळी बागेतून स्थानिक रेल्वेस्थानकावर आणि दिल्ली रेल्वेस्थानकावरून पुन्हा व्यापाऱ्यांच्या गोदामात वाहतूक करावी लागेल.

रावेर ः ‘व्हीपीयू’ प्रकारच्या रेल्वेच्या केळी वॅगन्स भाड्यात ५० टक्के सवलत दिली, तर जानेवारी-फेब्रुवारीत रेल्वेद्वारे पुन्हा एकदा केळी वाहतूक सुरू करण्याबाबत विचार करता येईल, असा प्रस्ताव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आज रेल्वे प्रशासनापुढे ठेवला. 

रेल्वे प्रशासनाने या सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी बंद पडलेली रेल्वेची केळी वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी बैठक झाली. या बैठकीत अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, डी. के. महाजन, कडू धोंडू चौधरी, रामदास पाटील, हरीश गनवाणी, मोहन भिका पाटील, राहुल पाटील, किशोर पाटील, नरेश सुखेजा हे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते. सध्या कापणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले आहे. 

रेल्वेने केळी पाठवण्यात अडचणी 
सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी रेल्वे वॅगन्सद्वारे दिल्ली आणि कानपूर येथे केळी पाठवण्यात येत होती. मात्र, अलीकडे केळी बागेतून थेट व्यापाऱ्यांच्या गोदामात ट्रकद्वारे केळी पोचते. त्यामुळे रेल्वेने केळी पाठवण्याबाबत शांतपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. रेल्वेने केळी पाठवायचे झाल्यास केळी बागेतून स्थानिक रेल्वेस्थानकावर आणि दिल्ली रेल्वेस्थानकावरून पुन्हा व्यापाऱ्यांच्या गोदामात वाहतूक करावी लागेल. यामुळे पुन्हा-पुन्हा केळीची उचलठेव करावी लागणार आहे. यातून हमाली खर्च तर वाढणारच आहे, पण जादा हाताळणीमुळे केळीच्या दर्जावर ही परिणाम होऊ शकेल. यापेक्षा थेट बागेतून ट्रकद्वारे व्यापाऱ्यांच्या गोदामापर्यंत केळी पाठविणे सोयीस्कर असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले. तथापि, ‘व्हीपीयू’ प्रकारच्या केळी वॅगन्सच्या भाड्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ५० टक्के अनुदान दिल्यास जानेवारी-फेब्रुवारीत सुरू होणाऱ्या नव्या हंगामात रेल्वे वॅगन्स केळी भरून पाठविण्याबाबत विचार करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. 

सात-आठ वर्षांपूर्वी केळी वॅगन्सबाबत रेल्वेने कठोर निर्णय घेतले त्यामुळे वाहतूक बंद पडली आहे. अन्यथा ती हळूहळू का असेना सुरू राहिली असती, तर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढवता आली असती. सात-आठ वर्षांनंतर पुन्हा रेल्वेने केळी वाहतूक सुरू करणे काहीसे अवघड आहे. सध्या ज्यांना शक्य आहे, त्यांनी रेल्वेशी संपर्क साधून वॅगन्स भराव्यात. 
- भागवत पाटील, 
अध्यक्ष, भारतीय केळी उत्पादक महासंघ, निंबोल.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver Banana farmers and traders want Fifty percentdiscount on banana transport rates