१८० वर्षांची परंपरेचा रथोत्सव; कोरोनमूळे यंदा पाच पावलेच ओढला जाणार ! 

दिलीप वैद्य
Wednesday, 30 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथाची मिरवणूक शहरातून काढली जाणार नाही. मात्र, लालबहादूर शास्त्री चौकातील रथाच्या नेहमीच्या जागेवरून रथाचे परंपरेप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले जाणार आहे.

रावेर : येथे दत्त जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यासाठी रथोत्सवाची तयारी श्री दत्त मंदिर प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ण केली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथाचे फक्त पूजन केले जाणार असून, पाच पावले रथ ओढून पारंपरिकता जपली जाणार आहे. 

आवश्य वाचा- शहरात रात्री संचारबंदी आणि चोरट्यांचा मुक्तसंचार; चोरीच्या घटना काही थांबेना 

 

येथील रथोत्सवाला सुमारे १९० वर्षांची परंपरा आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शहरातून सुमारे ३० फूट उंचीच्या भव्य लाकडी रथाची मिरवणूक काढले जाते. उद्या ( ता ३१) ही मिरवणूक परंपरेप्रमाणे अपेक्षित होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथाची मिरवणूक शहरातून काढली जाणार नाही. मात्र, लालबहादूर शास्त्री चौकातील रथाच्या नेहमीच्या जागेवरून रथाचे परंपरेप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले जाणार आहे. श्री बालकृष्ण रथात स्थापन करून विधिवत पूजन केले जाणार आहे. आरती झाल्यानंतर औपचारिक पाच पावले रथ ओढून उपस्थित भाविकांना दर्शनासाठी वेळ देण्यात येणार आहे. नंतर तिथेच विसर्जन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे श्री दत्त मंदिर संस्थानच्या फेसबुकवरून थेट प्रसारण केले जाणार असून, भाविकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क बांधूनच यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान समितीने केले आहे. 

दुपारी रथाची होणार पुजा
या पार्श्‍वभूमीवर बुधवारी दुपारी उत्साही युवक आणि भाविकांनी रथ मंदिरातून जवळच असलेल्या लालबहादूर शास्त्री चौकात आणला. येथे सायंकाळी उशिरा आणि गुरुवारी सकाळी रथाची सजावट केली जाणार आहे. गुरुवारी दुपारी दोनला रथाचे पूजन होऊन आरती केली जाणार असल्याचे गादीपती श्रीपाद महाराज कुलकर्णी, श्रीरंग कुलकर्णी आणि ऋषिकेश कुलकर्णी यांनी कळविले आहे. 

वाचा- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या निर्यातीचा मिळणार लाभ; तो कसा ? वाचा सविस्तर !

 

सर्वसमावेशक लोकोत्सव 
सुमारे १८० वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव आता लोकोत्सव झाला आहे. समाजातील सर्व जातीधर्माचे लोक यात सहभागी होतात. हा उत्सव सुरू होते, त्या वेळी आपापल्या व्यवसायानुरूप सर्वच लोकांनी या उत्सवात मदत केली, हातभार लावला. ती परंपरा आजही कायम आहे. 

रथोत्सवाची जबाबदारी वाटलेली

रथ ओढताना लागणाऱ्या लाकडी मोगऱ्या तयार करण्याची जबाबदारी सुतार समाजाकडे, या मोगऱ्यांच्या मदतीने रथाला दिशा देण्याची जबाबदारी कासार समाजाकडे, फुलांची सजावट माळी समाजाकडे, प्रसाद वाटप लोहार समाजाकडे, पालखी सोहळ्याची जबाबदारी सोनार समाजाकडे आहे. पालखीच्या दिवशी बैलगाडीतून श्रीकृष्ण, बलरामांची मिरवणूक निघते. त्यांना सजविण्याची जबाबदारी वैद्य परिवाराकडे, बैलगाडीची आणि दहीहंडीची व्यवस्था वाणी परिवाराकडे आहे. सच्चिदानंद महाराजांना रावेरला आणण्यासाठी त्यावेळी अग्रवाल आणि वाणी समाजातील भाविकांनी प्रयत्न केले होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver chariot corona will be dragged five steps