esakal | केळी पीकविम्याबाबत दोन दिवसांत तोडगा काढा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

केळी पीकविम्याबाबत दोन दिवसांत तोडगा काढा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

केळी पीकविम्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी एक समिती गठित करावी व त्या समितीने याबाबत उपाय सुचवावेत, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

केळी पीकविम्याबाबत दोन दिवसांत तोडगा काढा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर  : राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पीकविम्याच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाबाबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपनीबरोबर येत्या दोन दिवसांत चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी झालेल्या अधिकारी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत श्री. ठाकरे यांनी हे निर्देश दिले. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दुपारी चारला ही बैठक बोलविली होती. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीस शेतकऱ्यांनी केळी पीकविम्याच्या अन्याय्य निकषांबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. भागवत पाटील यांनी निवेदन दिले व केळी पीकविम्याचे निकष पूर्वीप्रमाणेच असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. ठाकरे यांनी सांगितले, की ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यात पीकविम्याचे निकष बदलले आहेत तोच फॉर्म्युला जळगाव जिल्ह्यासाठी वापरण्याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा. जर अन्याय्य निकष बदलले नाहीत तर प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काय देता येईल याच्याही शिफारशी या अधिकाऱ्यांनी सरकारला सादर कराव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीनंतर कृषिमंत्री भुसे, पालकमंत्री पाटील, आमदार चौधरी आणि शेतकऱ्यांची पुन्हा चर्चा झाली. ही बैठक सकारात्मक झाली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले. या वेळी विनोद तराळ (अंतुर्ली), रमेश पाटील (चोरवड), विकास महाजन (ऐनपूर), राहुल पाटील (बलवाडी), शशांक पाटील (तांदलवाडी), पीतांबर पाटील (कोचूर), किशोर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, निळकंठ चौधरी आदी केळी उत्पा.. दक शेतकरी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांना केळीचे वेफर भेट 
केळी पीकविम्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी एक समिती गठित करावी व त्या समितीने याबाबत उपाय सुचवावेत, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेले केळीचे वेफर्स पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांनी भेट म्हणून दिले. 

संपादन- भूषण श्रीखंडे