उत्तर भारताच्या आंब्यामुळे…श्रावणातही केळीचे भाव झाले ‘लॉक’!

दिलीप वैद्य 
बुधवार, 8 जुलै 2020

दर वर्षी श्रावणाची चाहूल लागली, की केळीच्या भावात हमखास शंभर ते दीडशे रुपये क्विंटलची वाढ होते. उत्तर भारतात श्रावण महिना सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत, पण केळीच्या भावात वाढ झाली नाही.

रावेर  : उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झाला, तरी केळीचे भाव ५०० ते ७०० रुपयांत लॉक झाले आहेत. कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने आणि उत्तर भारतातील आंब्याची आवक बाजारपेठेत वाढल्याने केळीचे भाव वाढले नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी १५ दिवसांत आंबा कमी झाल्यावर केळीच्या भावात थोडीफार वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दर वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये जिल्ह्यातून केळीची सर्वांत जास्त वाहतूक होते. पावसामुळे केळीचे वजन वाढते आणि मोठ्या प्रमाणावर केळी कापणीला येते. सध्या रावेर तालुक्यातून उत्तर भारतात रोज २१० ते २२५ ट्रक भरून केळी रवाना होत आहे. रोज सुमारे ३५ हजार क्विंटल केळी जाते. जिल्ह्यातील केळी पिकविणाऱ्या यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव आदी तालुक्यांतून सुमारे ५० ट्रक म्हणजे सात हजार ५०० क्विंटल केळी रोज कापणी होत असल्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे ४० हजार क्विंटल केळी उत्तर भारतातील बाजारपेठेत जाते. येथून २५ किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर येथून १२५ ते १४० ट्रक केळीचा लिलाव रोज होतो. 

केळीला ५०० ते ७०० रुपये भाव 
सध्या येथील बाजार समितीत केळीला ७७० रुपये क्विंटल, फरक १२ रुपये असा एकूण ८४२ रुपये भाव असला, तरीही प्रत्यक्षात व्यापारी केळीला ५०० ते ६५० रुपये भाव देत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठविल्या जाणाऱ्या अत्यंत दर्जेदार मोजक्या केळीला ७०० रुपये भाव मिळतो. 

भाववाढ नाहीच 
दर वर्षी श्रावणाची चाहूल लागली, की केळीच्या भावात हमखास शंभर ते दीडशे रुपये क्विंटलची वाढ होते. उत्तर भारतात श्रावण महिना सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत, पण केळीच्या भावात वाढ झाली नाही. बाजार समितीच्या फलकावरील भावही केळीला मिळत नाही, अशी बिकट स्थिती आहे. मागील वर्षी याच काळात केळीला हजार ते अकराशे रुपये किमान भाव होता. या वर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३०० ते ६०० रुपयांचा फटका बसत आहे. ५०० रुपयांत उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, केळी नाशवंत असल्याने कापणीशिवाय पर्याय नाही. 

या आठवड्यात तालुक्यातून उत्तर भारतात केळीची झालेली वाहतूक ट्रकसंख्या 
२९ जून : १९० 
३० जून : २२० 
१ जुलै : २२१ 
२ जुलै : २१३ 
३ जुलै : २०४ 
४ जुलै : १७३ 
५ जुलै : २०५ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver Daily export of 40,000 quintals of bananas from Jalgaon district