रावेर दंगलीतील पाचजणांवर एमपीडीए कारवाई; नाशिक जेलमध्ये रवाना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

रावेर शहरात २२ मार्च रोजी कोरोना संसर्गजन्य आजाराला कंट्रोल करण्याकरिता जनता कर्फ्यु चालू असताना येथील शिवाजी चौक, मण्यार मस्जिदजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल झाली. त्याचे पडसाद शहरात उमटून अवघ्या दोन तासातच सहा दंगलीचे गुन्हे घडले.

रावेर (जळगाव) : रावेर शहरात गेल्या मार्चमध्ये झालेल्या दंगलीतील पाच जणांना एमपीडीए अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. या पाच जणांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या स्थानबध्दतेबाबत जिल्हाधिकारी यांनी कालच मंजुरी दिली. शहरात शांतता रहावी यासाठी या दंगलीतील सुमारे १२ ते १५ जण पोलीसांच्या रडारवर असल्‍याची माहिती पोलीस निरिक्षक रामदास वाकोड़े यांनी दिली.

पोलीस अधिकारी व पोलीसांनी शहरात नेहमी दंगे घडविणे, दंग्यात भाग घेणे, दंगे करण्यास लोकांना चिथावणी देणाराची माहिती गोळा करून त्यांवर दाखल गुन्ह्याची माहिती काढून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, मनोज वाघमारे, राजेंद्र करोडपती, इस्माईल शेख, पो ना नंदकिशोर महाजन, पो ना महेंद्र सुरवाडे, हे पो कॉ तुषार मोरे,पो कॉ सुरेश मेढे,पो कॉ मंदार पाटील,पो कॉ पुरुषोत्तम पाटील,पो कॉ निलेश लोहार, पो कॉ ज्ञानेश्वर चौधरी ,हे कॉ विजय, हे कॉ दत्तात्रय बडगुजर, हे कॉ विजय पाटील, हे कॉ बिजू जावरे यांनी मेहनत घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्द होणेकरिता प्रस्ताव पाठविला होता. 

असे घडले होते प्रकरण
रावेर शहरात २२ मार्च रोजी कोरोना संसर्गजन्य आजाराला कंट्रोल करण्याकरिता जनता कर्फ्यु चालू असताना येथील शिवाजी चौक, मण्यार मस्जिदजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल झाली. त्याचे पडसाद शहरात उमटून अवघ्या दोन तासातच सहा दंगलीचे गुन्हे घडले. यात एका खुनासह दंगा व पाच गुन्हे हाफ मर्डरसह दंगा असे गुन्हे घडले होते. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे घटनास्थळी पोहचून दंगा काबूत आणला होता. येथे बारा दिवसांची संचारबंदी लागू काण्यात आली होती.

ते पाच आरोपी
जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शनिवारी (ता.१९) रोजी एमपीडीए कायदा कलम-३(१) अन्वये शेख कालु शेख नुरा (वय ५३ रा. मन्यार मोहल्ला रावेर), शे मकबूल शे मोहियोद्दीन (वय ५७ रा. मदिना कॉलोनी रावेर), आदीलखान राजू बशीरखान (वय २२ शंकरप्लॉट वेर), स्वप्नील मनोहर पाटील (वय ३४ रा. बक्षीपुर), मधुकर रामभाऊ शिंदे (वय ६२ शिवाजीनगर रावेर) या पाच आरोपी विरुद्ध एक वर्षाकारीता स्थानबद्दबाबत आदेश करण्यात आला आहे. सर्व आरोपीना लागलीच ताब्यात घेऊन आज नाशिक जेल येथे दाखल केले आहे.

आणखी काही जणांवर होणार कारवाई
दंगलीतील आणखी व मोक्का कायद्यान्वये १२ ते १५ आरोपीवर कारवाई होणेकरिता पोलिसांची कसून तयारी चालू आहे. यापुढे रावेर शहरातील शांतता भंग करण्याचा, दंगली घडवून आणणे, कायद्याचे उल्लंघन करणारे इसमावर अतिशय सक्त कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी सांगितले. रावेर शहरातील प्रत्येक नागरिकांनी पोलिसांना शांतता अबाधित राहणे करीत सहकार्य करावे व कोणीही कायद्याचे उल्लंघन करणार नाही याची प्रत्येकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver dangal five parson mpda action and police arrested