esakal | कर्करोगापाठोपाठ कोरोनावरही मात 
sakal

बोलून बातमी शोधा

corona free

पाठक परिवाराच्या मागे २४ जूनला कोरोनाचे दुखणे लागले. नितीन पाठक यांच्या आई सीमा पाठक यांना पूर्वी पोटाचा कर्करोग झाला होता. नाशिकमध्ये त्यावर शस्त्रक्रिया करून आठ वेळा केमोथेरपी करण्यात येऊन त्या कर्करोगमुक्त झाल्या आहेत.

कर्करोगापाठोपाठ कोरोनावरही मात 

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : कोरोनातून कर्करोगग्रस्त आणि मधुमेह असलेले रुग्ण सहसा घरी परत येत नाहीत, असा गैरसमज सर्वसामान्य जनतेत पसरला आहे. मात्र, येथील रेल्वेस्थानक रस्त्यावरील कोर्टासमोर राहणाऱ्या पाठक परिवारातील ६७ वर्षीय मधुकर पाठक यांना उच्च मधुमेह, तर त्यांच्या पत्नी सीमा पाठक कर्करोगग्रस्त असूनही कोरोनावर मात करून दोघेही यशस्वीपणे आपल्या घरी परतले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव आणि येथील सरस्वती विद्यामंदिराचे उपशिक्षक नितीन पाठक आणि त्यांचा मुलगा तन्मय हे दोघेही शहरातील पहिले ‘होम क्वारंटाइन’ होऊन कोरोनातून सुखरूपपणे बाहेर आले आहेत. 
पाठक परिवाराच्या मागे २४ जूनला कोरोनाचे दुखणे लागले. नितीन पाठक यांच्या आई सीमा पाठक यांना पूर्वी पोटाचा कर्करोग झाला होता. नाशिकमध्ये त्यावर शस्त्रक्रिया करून आठ वेळा केमोथेरपी करण्यात येऊन त्या कर्करोगमुक्त झाल्या आहेत. मात्र, त्यांना कोरोनाने गाठले. ६७ वर्षीय मधुकर पाठक यांचे हृदय केवळ ५२ टक्के काम करते आणि त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. सीमा पाठक जळगावच्या गोदावरी रुग्णालयात, तर मधुकर पाठक भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात! मुलगा नितीन आणि छोटा तन्मय हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आणि रावेरच्या कोविड केअर सेंटरमध्ये. नितीन पाठक यांच्या पत्नी आणि चार वर्षांची मुलगी मात्र कोरोना निगेटिव्ह म्हणून घरी. 
सहा जणांचे हे कुटुंब चार ठिकाणी विभागले गेले. मात्र, नंतर नितीन पाठक यांनी येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विनंती करून घरीच राहण्याची परवानगी घेतली. कोरोना पॉझिटिव्ह असूनही घरी राहण्याची शहरातील पहिली परवानगी नितीन आणि तन्मय पाठक यांना मिळाली. 

मजबूत मनोबल, योग्य उपचार 
चांगली रोगप्रतिकारशक्ती आणि मजबूत मनोबल, योग्य उपचार यांच्या जोरावर पाठक परिवाराने कोरोनावर मात केली आणि आणि चौघे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊन आपल्या घरी परतले आहेत. या काळात आपला सहकारी मित्र गोपाल मिस्त्री याने आम्ही कोरोना पॉझिटिव्ह असूनही आमच्या घरी येऊन पाणी, सॅनिटायझर, दूध आणि जीवनावश्यक वस्तू कोणतीही भीती मनात न बाळगता आम्हाला पुरविल्या आणि मानवतेचे प्रदर्शन घडविले. कोरोना पॉझिटिव्ह होण्याची वेळ कोणा मित्र किंवा जवळच्या कुटुंबावर येऊ नये. मात्र, दुर्दैवाने असे झाल्यास त्या कुटुंबासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला मी तत्पर असेन, अशी प्रतिक्रिया नितीन पाठक यांनी व्यक्त केली.