केळी पीकविम्याचा तिढा सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरू !

दिलीप वैद्य
Tuesday, 27 October 2020

राज्यभरातील सुमारे एक लाख केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या पीकविम्याबाबत अद्यापही तोडगा निघत नसल्याने पुढील दिशा ठरवीणार आहे.

रावेर : केळी पीकविम्याच्या अन्यायकारक निकषांकडे आज दुर्लक्ष केले तर आगामी तीन वर्षे हा अन्याय सहन करावा लागेल म्हणून बुधवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीतील निर्णयाची वाट पाहून नंतर लगेच या विरोधात आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचा निर्णय सोमवारी सर्वपक्षीय केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

बाजार समितीच्या वतीने आयोजित या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील होते. आमदार शिरीष चौधरी आणि आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती. 
राज्यभरातील सुमारे एक लाख केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या पीकविम्याबाबत अद्यापही तोडगा निघत नसल्याने पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी सुरेश धनके यांनी सांगितले, की या प्रकरणी तातडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्यावे व सरकारने केळी पीकविम्यासाठी मुदत वाढवावी. माजी सभापती व संचालक राजीव पाटील म्हणाले, की या प्रकरणी रस्त्यावर उतरून संघटित होऊन आंदोलन करण्यास शेतकऱ्यांनी तयार राहावे.

आमदार पण शेतकऱयां सोबत

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, की या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान कमी झाल्यामुळे निकषात बदल झाले आहेत. मात्र, या प्रकरणी आपण शेतकऱ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होण्यास तयार आहोत. आमदार चौधरी यांनी यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या हालचालींचा सविस्तर आढावा घेऊन सांगितले, की या वर्षी निकष बदलले गेले नाहीत तरीही शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तरीही न्याय न मिळाल्यास यासंदर्भात आंदोलनाची योग्य दिशा शेतकरी प्रतिनिधीने ठरवावी. त्यात आम्ही दोघे आमदार असलो तरी शेतकरी म्हणून सर्वांच्या पुढे असू. या प्रकरणी राजकीय ओढाताण करू नये, सर्वपक्षीय समिती तयार करून पुढील दिशा ठरवावी, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडे उद्या बैठक 
आजच्या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. मुंबईत बुधवारी (ता. २८) केळी पीकविम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत केळी पीकविम्याबाबत काहीतरी योग्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver meeting of banana growers farmers warned to banana crop policy.