४४ मोबाईल टॉवर सील आणि या तालुक्यात झाली पंचाईत  

दिलीप वैद्य
Friday, 18 December 2020

मोबाईल टॉवर्स बंद पडल्यामुळे त्याचा फटका नागरिकांसह तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह असंख्य नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बसला.

रावेर : महसूल विभागाची थकबाकी न भरल्यामुळे तालुक्यातील इंडस कंपनीचे ३४ आणि जीटीएल कंपनीचे १० असे एकूण ४४ मोबाईल टॉवर गुरुवारी महसूल विभागाने सील केले. यामुळे तालुक्यातील मोबाईल आणि इंटरनेटसेवा कोसळली असून, तहसीलदारांसह तहसीलदार कार्यालयातील अनेकांचे मोबाईल यामुळे बंद झाले होते. 

जळगावची महत्वाची बातमी- पोलिसांनी हटकल्याचा राग रिक्षाचालकाने केले चक्क अपहरण

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी बुधवारी (ता. १६) फैजपूर येथे वसुलीबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महसूल वाढविण्याची आणि सक्तीने गोळा करण्याची ताकीद दिल्यामुळे महसूल विभाग बुधवारपासूनच कामाला लागले होते. रावेर तालुक्याला वसुलीचा इष्टांक वाढवून देण्यात आल्याची चर्चा महसूल विभागात होती. 

२५ लाखाची थकबाकी
बुधवारी (ता. १६) आणि गुरुवारी (ता. १७) मिळून महसूल विभागाने तालुक्यातील या इंडस कंपनीचे ३४ मोबाईल टॉवर आणि गुरुवारी जीटीएल कंपनीचे दहा मोबाईल टॉवर्स सील केले आहेत. इंडस कंपनीकडे १९ लाख १९ हजार ३७० रुपयांची, तर जीटीएल कंपनीकडे सहा लाख २३ हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

वीज पुरवठा खंडीत

मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणि आणि मोबाईल टॉवर परिसरातील कंपनीचे इन्व्हर्टरही बंद पडल्यामुळे असंख्य मोबाईल कंपन्यांची सेवा बंद झाली आहे किंवा विस्कळीत झाली आहे.

अन मोबाईलचे नेटवर्क गायब

गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरातील शेकडो लोकांचे मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत होते. मोबाईल टॉवर्स बंद पडल्यामुळे त्याचा फटका येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह असंख्य नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बसला. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन दुपारपासून बंद होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. 

आवश्य वाचा- भारत- पाकिस्तान युद्धातील वीर जवानाकडून शौर्य पदके परत; काय आहे कारण वाचा सविस्तर..

पैसे भरण्यासाठी मागितली मुदत 
सर्वसामान्य नागरिकही आपल्या कामांसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकत नव्हते, अशी स्थिती निर्माण झाली होती. मोबाईल टॉवर बंद केल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे भरण्यासाठी लेखी पत्र देऊन पैसे भरण्यासाठी मुदत मागितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver mobile tower sealed revenue department