दार उघडून पाहिले तर दृश्‍य पाहून ते घाबरतच आले बाहेर

दिलीप वैद्य
Thursday, 10 September 2020

कोरोनाचा संसर्ग असल्‍याने रोझोदा येथे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्‍या रूग्‍णाच्या शेजारी आरोग्‍य विभागाचे पथम तपासणीसाठी आले. दार ठोठावले असता काही प्रतिसाद न मिळाल्‍याने त्‍यांनी दार उघडून पाहिले. घरातील दृश्‍य पाहून पथकामील कर्मचारी ओरडतच बाहेर आले. यानंतर गावात चर्चेला एकच उधाण आले होते. 

रावेर : तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध जोडप्याचा खून झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून खूनाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. 

रोझोदा येथील ओंकार पांडुरंग भारंबे (वय ९०) आणि सुमनबाई ओंकार भारंबे (वय ८५) हे वयोवृद्ध जोडपे राहात होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईत नोकरीस आहेत. या जोडप्याच्या शेजारी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जोडप्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सकाळी दहाच्या सुमारास आले. त्‍यांनी दाम्‍पत्‍याचे दार ठोठावले असता आतून कोणत्‍याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पथकाने दार उघडताच समोर ओंकार भारंबे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यामुळे हा प्रकार उघडकीला आला. तर सुमन भारंबे यांचा मृतदेह स्वयंपाक खोलीत गॅसच्या ओट्याजवळ आढळून आला. 

चोरांनी खुन केल्‍याचा अंदाज
सुमन भारंबे यांच्या अंगावर दागिने आढळून आले नाहीत. यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्यांनी हा खून केल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या वृद्ध जोडप्याचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याचे आढळून येत आहे. खुनाचे नेमके कारण काय असावे याचा शोध घेतला जात आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver old age husband wife murder case open morning