esakal | दोन मुले असूनही ती निराधार...पोलिसपाटलाने केला हा प्रकार म्‍हणून वृद्धा दहा किमी गेली पायी
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay gandhi niradhar yojna

महिलेची दोन्ही मुले विवाहानंतर त्यांच्या सासूरवाडीला राहत असून, ते वृद्ध आईचा सांभाळ करीत नाहीत. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आणि लोकांच्या मदतीवर ही महिला कशीबशी आपली उपजीविका चालविते. 

दोन मुले असूनही ती निराधार...पोलिसपाटलाने केला हा प्रकार म्‍हणून वृद्धा दहा किमी गेली पायी

sakal_logo
By
प्रदीप वैद्य

रावेर : तालुक्यातील खिरवड येथील ७० वर्षीय वृद्ध व असहाय्य महिलेच्या संजय गांधी निराधार योजनेचे व अन्य शासकीय अनुदानाचे पैसे गावातील पोलिसपाटलाच्या नातेवाइकाने परस्पर काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी (ता. २४) येथील तहसीलदारांसमोरच उघडकीस आला. याबाबत चौकशीचे आदेश तहसीलदारांनी दिले. 
तालुक्यातील खिरवड येथील जयवंताबाई जगजीवन अटकाळे ही ७० वर्षीय वृद्ध, असहाय्य महिला आपल्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे का मिळाले नाहीत, या चौकशीसाठी सुमारे दहा किलोमीटर पायी चालत रावेर येथे आली होती. या महिलेची दोन्ही मुले विवाहानंतर त्यांच्या सासूरवाडीला राहत असून, ते वृद्ध आईचा सांभाळ करीत नाहीत. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आणि लोकांच्या मदतीवर ही महिला कशीबशी आपली उपजीविका चालविते. 

अन्‌ सुरू झाली चौकशी
याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी या महिलेच्या नावावर पैसे जमा झाले की नाही, हे पाहण्याचे निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी या महिलेच्या नावावर मे आणि जूनचे अनुदान बँकेत जमा झाल्याची खात्री केली. यावर श्रीमती देवगुणे यांनी खिरवडचे तलाठी आर. एस. झांबरे यांना संबंधित बँकेत जाऊन महिलेच्या खात्याचे पासबुक भरून आणण्यास आणि सोबत खाते उताराही आणण्यास सांगितले. या बँकेतील नोंदीमध्ये महिलेच्या नावावर पंतप्रधान योजनेचे दोन हजार रुपये आणि संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झालेले दिसत होते. हे पैसे या महिलेने काढून घेतल्याच्याही नोंदी होत्या. 

पाटलाने काढले दहा हजार
श्रीमती देवगुणे आणि निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी ते बघून पैसे काढण्याबाबत महिलेकडून अधिक माहिती घेतली असता तिने गावातील पोलिसपाटलाच्या जवळच्या नातेवाइकाने दोनदा आपल्याला पाचशे रुपये दिले आणि इतकेच पैसे खात्यात आल्याचे सांगितले. पोलिसपाटलाच्या आप्तस्वकीयाने निराधार व अशिक्षित महिलेचे अंगठे घेऊन तिच्या नावावरील पाच हजार रुपये दोनदा काढून अवघे हजार रुपये दिले असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, श्रीमती देवगुणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच फसवणूकप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे तक्रारदार जयवंताबाई अटकाळे यांना सूचित केले आहे. श्रीमती देवगुणे यांनी या महिलेस मदत म्हणून अन्नधान्याचे किट दिले. 

पोलिसपाटलाच्या नातेवाइकाचा प्रताप 
वृद्ध महिलेचे पैसे परस्पर काढून घेणाऱ्या युवकाचे खिरवड येथे ग्राहक सेवा केंद्र असून, या युवकाने अशाच प्रकारे गावातील व परिसरातील अनेक अशिक्षित आणि निराधार महिलांना फसवून हजारो रुपये काढून घेतले असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top