प्रसादाची रेवडी कशी बनते पहा..रोज तीस क्‍विंटलचे उत्‍पादन

दिलीप वैद्य
Thursday, 17 December 2020

हिवाळ्याची चाहूल लागली, की रेवडी तयार करणे सुरू होते. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे उत्पादन सुरू आहे. सुमारे २५ ते ३० क्विंटल एवढी रेवडी रोज तयार होते.

रावेर (जळगाव) : येथील दत्त जयंती उत्सव हळूहळू जवळ येत असल्याने येथील यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या रेवडीचे उत्पादन सुरू झाले आहे. या वर्षी रथ आणि पालखी यांची मिरवणूक काढता येणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केलेले असले तरीही रेवडी मोठ्या प्रमाणात विकली जाईल, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. सध्या दररोज २५ ते ३० क्विंटल उत्पादन शहरात होत आहे. 
दत्त जयंती उत्सव मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे थंडीत येतो. थंडीच्या दिवसात गूळ आणि तीळ यांचे सेवन आयुर्वेदात आरोग्याला पोषक मानले जाते. त्यांचे सेवन शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्मांक निर्माण करते हे ओळखून दत्त जयंती उत्सवात रेवडी प्रसादरूपाने देण्याची पद्धत सुरू झाली. 

रोज ३० क्विंटल उत्पादन 
हिवाळ्याची चाहूल लागली, की रेवडी तयार करणे सुरू होते. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे उत्पादन सुरू आहे. सुमारे २५ ते ३० क्विंटल एवढी रेवडी रोज तयार होते. दत्त जयंती उत्सव जसजसा जवळ येईल, तसतशी मागणी आणखी वाढेल, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. ही रेवडी रथावर उधळली जाते. अनेक भाविक दत्तजन्मनिमित्त नवस मानतात आणि तो पूर्ण झाल्यावर जितकी किलो रेवडी रथावर उधळण्याचा नवस मानला आहे, तितकी किलो रेवडी विकत घेऊन ती रथावर उधळली जाते. बाहेरगावाहून यात्रोत्सवात येणारे भाविक परत जाताना आपल्यासोबत हमखास किलो- दोन किलो रेवडी प्रसाद म्हणून नेतातच. 

अशी बनते रेवडी
गुळाचा पाक सुमारे दोन तास उकळून तो थंड केला जातो. त्याला ओढून नरम करून त्यात तीळ मिसळली जाते. पूर्वी तीळ जास्त मिसळली जात असे. अलीकडे तिळीचे भाव वाढल्याने गुळाच्या गरम पाकाला ती बाहेरून चिकटवली जाते. लाकडाच्या भट्टीवरच कढई ठेवून गुळाचा पाक उकळण्यात येतो. त्यामुळे रेवडी चविष्ट लागते. स्थानिक बाजारपेठेतच सध्या ती विकली जात आहे. या वर्षी रेवडी व्यवसायात मंदी आहे. मागील वर्षी एवढेच म्हणजे १२० रुपये किलो इतकेच भाव या वर्षी आहेत. त्यात वाढ झालेली नाही. 

परिसरातही विक्री 
हिवाळ्याच्या दोन-अडीच महिन्यात शहर आणि परिसरात किमान एक हजार क्विंटल रेवडीचे उत्पादन होते, असा अंदाज आहे. फक्त रावेरच नाही तर परिसरातील रसलपूर, केऱ्हा‍ळा, वाघोड येथील यात्रोत्सवात आणि परिसरातील आठवडेबाजारातही रेवडीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver revadi production daily thirty kvintle