esakal | सावद्यात साकारणार मियावाकी प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

सावद्यात साकारणार मियावाकी प्रकल्प

सावद्यात साकारणार मियावाकी प्रकल्प

sakal_logo
By
प्रविण पाटील

सावदा : वाढती वृक्षतोड(Deforestation), प्रदूषण (Pollution), ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा, याचा विचार करून येथील तरुणाईने गुरुजी सेवा संस्था संचलित तुकाराम वृक्ष सेवा मंडळ वृक्षमित्र टीम तयार करून शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. तीन वर्षांपासून ही टीम जोमाने कामाला लागली आहे. आतापर्यंत शहरातील विविध भूखंडावर अंदाजे ८६० वृक्षांची लागवड (Trees Planting ) पूर्ण करून त्याचे संवर्धन केले जात आहे. नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करणारा मियावाकी प्रकल्प लोकसहभागातून राबविण्याचा निर्धार वृक्ष टीमने केला असून, १ जुलैपासून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पासाठी सुगंगानगरमधील ३१ हजार ८५० चौरस फुटाच्या खुल्या भूखंडाची निवड करण्यात आली आहे.

(savda city open plot trees planting miyawaki project)

हेही वाचा: नगरसेविकेच्या बनवाट स्टॅम्पच्या अधारे ‘आधार’चा धंदा

वृक्षलागवडीला मदतीचा हात

वृक्ष टीमचे कार्य पाहून समाजातील अनेक जण प्रभावित झाले. त्यांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे. मियावकी प्रकल्पानिमित्ताने एक बैठक साहित्यिक लेखक प्रा. व. पु. होले यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी शहरातील शल्यचिकित्सक व पर्यावरणप्रेमी डॉ. व्ही. जे. वारके, प्रा. व. पु. होले, ताप्ती सातपुडा जनरल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, वृक्षमित्र टीमचे हृषीकेश पाटील, निखिल चौधरी, कल्पेश शिवदे उपस्थित होते. या वेळी डॉ. वारके यांनी मियावकी प्रकल्पासाठी लागणारा खर्च रुपये एक लाख दहा हजार देण्याचे जाहीर करून ती रक्कम वृक्षमित्र टीमकडे सुपूर्द केली. शिवाय, पालिका ही पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिले असून, समाजातून ही यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. प्रा. होले यांनी श्रमदानासाठी पुढाकार घेऊन ओम कॉलनीतील बालगोपाळांना नियोजित मियावाकी प्रकल्पस्थळी नेऊन त्यांच्याकडून काडी कचरा वेचून घेत त्यांना श्रमदान व वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले.

हेही वाचा: धरणगावात खोदकामाकरतांना आढळले दोन शिलालेख

वृक्षलागवड व पाणी अडवणे ते जिरविणे, यावर व्यापक स्वरूपात काम होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वृक्षमित्र टीमचे कार्य कौतुकास्पद आहे.

- डॉ. व्ही. जे. वारके

शल्यचिकित्सक तथा पर्यावरणप्रेमी, सावदा

‘मियावाकी’ काय आहे?

‘मियावाकी’ हा वृक्षलागवडीचा जपानी प्रकार आहे. यासाठी रिकामी व बरड जमीन निवडली जाते. त्या जागेवर जवळजवळ दोन बाय दोन फुटावर आखणी करून स्थानिक प्रजातीच्या झाडांची निवड करून ती लावली जातात. ती झाडे जवळ कमी अंतरावर लावली गेल्याने ती आडवी न पसरता वर आकाशाच्या दिशेने वेगाने वाढतात. दोन, तीन वर्षांतच घनदाट जंगल आकारला येते.

loading image