
जिल्हाधिकाऱ्यांसोबत रथोत्सवाबाबत बैठक झाली, जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जामनेर तहसीलदारांना निर्णय देण्याचे सांगितले होते.
शेंदुर्णी (जळगाव) : पावणे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शेंदुर्णीतील रथोत्सवाला यावेळी पहिल्यांदाच खंड पडणार आहे. कडोजी महाराज संस्थांचे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत व इतर भाविक यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत रथोत्सवाबाबत बैठक झाली, जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जामनेर तहसीलदारांना निर्णय देण्याचे सांगितले होते.
शेंदुर्णी नगरपंचायत येथे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात तहसीलदारांनी सांगितले, की कोरोनाचा प्रादुर्भाव बघता रथ बाहेर काढण्यास परवानगी दिली जाणार नाही. यावर नाराजी व्यक्त करून अमृत खलसे व पंडितराव जोरे यांनी रथ बाहेर काढून दर्शनासाठी भाविकांना संधी द्यावी, नियोजनाची जबाबदारी घेण्याची ही हमी दिली. मात्र भाविकांची अचानक गर्दी झाल्यास बंदोबस्त तोकडा पडेल.
दर्शनासही मनाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने तसे करण्यास तहसीलदारांकडून संमती देण्यात आली नाही. रथ आहे त्याच ठिकाणी ठेवून केवळ पाच जणांनी पूजा व आरती करून परंपरा कायम ठेवावी असे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आले. कोणतेही उपक्रम अथवा रथ प्रदक्षिणा, रथ दर्शनाला मनाई केली आहे. बैठकीला नगरपंचायत मुख्याधिकारी साजित पिंजारी, पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, तहसीलदार अरुण शेवाळे, कडोजी संस्थांचे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत, भूषण देवकर, महाराज मंदिराचे प्रमुख निंबाजी भगत, पंडितराव जोहरे, अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, शरद बारी, बंटी थोरात, श्रीकृष्ण चौधरी, संजय सूर्यवंशी, धीरज जैन व इतर नगरसेवक भाविक उपस्थित होते.
संपादन ः राजेश सोनवणे