हतनूर परिसरात फुलपाखरांच्या ६० प्रजाती आढळल्या 

प्रशांत पाटील  
Monday, 28 September 2020

हतनूर जलाशयाजवळ असलेल्या पाटाला लागुनच जैवविविधतेने नटलेल्या परिसरात फुलपाखरांच्या अधिवासात सकाळी आठ ते बारा या वेळेत फुलपाखरांचे सर्वेक्षण व नोंदी करण्यात आली.

तांदलवाडी (ता. रावेर) : फुलपाखरांच्या बागेत विविध रंगांची व सुंदर अशा नक्षीने नटलेल्या पंखांची फुलपाखरे स्वच्छंदपणे उडताना मन प्रसन्न करुन टाकतात. फुलपाखरांशी मैत्री होते ती बालपणीच. या फुलावरुन त्या फुलावर बागडणाऱ्या फुलपाखरांमागे लहान मुलांना पळण्याचा जणू छंदच जडतो! अशा या फुलपाखरांच्या रंगीबेरंगी दुनियेचा वेध घेण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे हतनूर जलाशयाजवळील पाटाजवळ रविवारी (ता. २७) सकाळी ‘बिग बटरफ्लाय मंथ’च्या निमित्ताने फुलपाखरांची गणना करण्यात आली. यात ६० प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या. 

देशात प्रथमच सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ फुलपाखरांचा महिना म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. भारतातील विविध प्रांतात फुलपाखरांच्या विविध प्रजातींची मोजणी करण्यात येत आहे. देशात कुठल्या ठिकाणी किती प्रजातींची फुलपाखरे आढळतात, त्यांचा अधिवास आदी सखोल अभ्यास केला जात आहे.

फुलपाखरू आणि निसर्ग यांविषयी जनजागृती व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. 
या मोहिमेत देशातील ३५ संस्था सहभागी असून, यातीलच चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन व सचिव उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हतनूर जलाशयाजवळ असलेल्या पाटाला लागुनच जैवविविधतेने नटलेल्या परिसरात फुलपाखरांच्या अधिवासात सकाळी आठ ते बारा या वेळेत फुलपाखरांचे सर्वेक्षण व नोंदी करण्यात आली. चार तासांत ६० प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या. या उपक्रमात चातक संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, विलास महाजन, समीर नेवे, मनोज बडगुजर, संजय पाटील, प्रशांत पाटील, सौरभ महाजन आदींनी सहभाग होता. 

 

आढळलेली फुलपाखरे 
कृष्ण कमलिनी, छोटा चांदवा, तृण पिलाती, गौरांग, भटक्या, पिवळा शेंदूर टोक्या, चट्टेरी भटक्या, केशर टोक्या, पंधरा शेंदूर टोक्या यांच्यासह परीसरात दुर्मिळ असलेले संगमरवरी सैराट व गडद शर अशा साठ प्रजातींची नोंद करण्यात आली. 

फुलपाखरू हे जैवविविधतेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरणातील परागीभवनाचे काम ते करतात. निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या फुलपाखरांचे निरीक्षण केल्यास तणाव, थकवा नाहीसा होऊन उत्साहात भर पडते. या भागात दुर्मिळ असलेले संगमरवरी सैराट व गडद शर यांचीही नोंद घेण्यात आली. सदर गणनेची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांना कळविण्यात येईल. 
- उदय चौधरी, सचिव, चातक निसर्ग संवर्धन संस्था 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tandalvadi Fifty species of butterflies were found at Hatnur under the Big Butter Fay Month