राखेचा वापर चक्‍क भरावासाठी; हवेत उडून श्‍वसनाचे विकार

विनोद सुरवाडे
Sunday, 4 October 2020

वरणगाव परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सध्या उड्डाणपुलाच्या कामावर जास्त भर दिला जात आहे.

वरणगाव (जळगाव) : महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या भरावासाठी नदी किंवा नाल्यांमधील गौण खनिजाचा वापर करणे बंधनकारक असताना महामार्ग प्राधिकरणातील कंत्राटदारांचे अधिकारी दीपनगर वीज केंद्रातील कोळशाच्या राखेचा वापर करीत असून, त्यासाठी विल्हाळे बंडातून राखेची वाहतूक केली जात आहे. मात्र, ही वाहतूक शहराच्या लोकवस्तीमधून होत असल्याने वाहनांमधून राख हवेत उडत असल्याने नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत आहे, असा आरोप करीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. राख वाहतूक तत्काळ बंद करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारादेखील काळे यांनी दिला आहे. 
वरणगाव परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सध्या उड्डाणपुलाच्या कामावर जास्त भर दिला जात आहे. परंतु शासन निर्णयानुसार भराव टाकण्यासाठी सभोवतालच्या नद्यांचे खोलीकरण करून त्यामधील निघणाऱ्या गौण खनिजाचा भरावासाठी वापर करावा. मात्र, त्याऐवजी कंत्राटदारांचे अधिकारी शासन नियमांचे उल्लंघन करून औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वरणगाव शहरातील जनजीवन विस्कळित होऊ पाहत असून, आधीच शहरातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भीतीने भयभित असताना त्यात राखवाहतूकमुळे त्रस्त झाले असून, नागरिकांना श्वसनासह दम्याचा त्रास जाणवू लागले आहेत त्या दृष्टीने शहरामधून वाहतूक होणारी राख बंद करण्यात यावी किंवा इतर मार्गाने करावी. 

घरात, दुकानांमध्ये साचतोय थर
शहरात राखेचा फैलाव होत असल्याने नागरिकांना श्वसन, तसेच नेत्रविकार जडत आहेत. तसेच दुकानांमध्ये देखील राखेचा थर साचत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, सामाजिक संघटना आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरातून राख वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी स्थानिक पोलिस प्रशासन, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, ठेकेदार मनमानी करून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना राख वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

राख हवेत उडून श्‍वसनविकार 
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून शहरातून अवजड वाहनांच्या सहाय्याने राख वाहतूक केली जात आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवून राख वाहतूक करीत आहेत. ताडपत्रीने झाकून नेणे आवश्यक असताना खुल्यानेच वाहतूक केली जाते. त्यामुळे राख हवेत उडून प्रदूषणात वाढ झाली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news warangaon ordanance factory the ashes use bridge