कोरोना कमी पण आता डेंगीचे थैमान 

राजु कवडीवाले
Friday, 4 December 2020

शहरातीत अनेक मुलांना डेंगी या घातक आजाराची लागण झाली असून, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले किंवा करीत आहेत. डेंगीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याचे आदेश देण्यात यावेत.

यावल (जळगाव) : येथे विविध प्रभागांत डेंगीने थैमान घातले असून, या आजाराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गांभार्याने विचार करून नगर परिषद प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे, की शहरात डेंगी या आजाराने थैमान घातले असून, शहरातील अनेक भागांत डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. डेंगी आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येने नागरिक आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत चिंतेत आहेत. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील अनेक विस्तारित भागात गटारी नसल्याने नागरिकांनी घाणीचे पाणी थांबविण्यासाठी शौचखड्डे तयार केले असून, त्यात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे तसेच शहरातील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या प्रभागात गटारी बांधलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या गटारी स्वच्छ करण्यात येत नसल्याने गटारी दुर्गंधीच्या पाण्याने तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरदेखील नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

मुलांना अधिक लागण
शहरातीत अनेक मुलांना डेंगी या घातक आजाराची लागण झाली असून, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले किंवा करीत आहेत. डेंगीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याचे आदेश देण्यात यावेत. ज्या प्रभागात डेंगीचा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनसेस्टाइलने प्रभाग नगरसेवकाकडून वसूल करणार असल्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर, सोहन धांडे, आबीद कच्छी, नितीन डांबरे, किशोर नन्नवरे, इस्माईल खान, श्‍याम पवार, अक्षय भोईटे यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal city dengue iffected people health department action