नाव बदलवून करायची ती विवाह; एक चुक अन्‌ झाला भांडाफोड

राजू कवडीवाले
Sunday, 29 November 2020

विठ्ठल मंदिरामध्ये लग्न लावून देण्याचा बनाव केला. लग्न लावून दिल्यावर संशयित आरोपी सोनाली कुऱ्हाडे ही दिगंबर फेगडे यांच्याकडे नांदण्यास आली. 

यावल (जळगाव) : येथील महाजन गल्लीतील एक अविवाहित मुलास, ‘तुझे लग्न लावून देते, त्यासाठी सत्तर हजार रुपये मुलीच्या वडिलाला द्यावे लागतील’, असे एका महिला एजंटने खोटे नाव सांगून फसवणूक केली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी येथील पोलिसांनी औरंगाबाद येथून एमआयडीसीमधील नवरीच्या घरातून सोन्या- चांदीचे दागिने हस्तगत केले असून, याप्रकरणी आणखी कोणाची फसवणूक झालीय काय, या दिशेने यावल पोलिसांचा तपास सुरू आहे. 
यावल पोलिस ठाण्यात २१ नोव्हेंबरला महाजन गल्लीमधील दिगंबर फेगडे यांच्या फिर्यादीवरून संशयित सोनाली कुऱ्हाडे (रा. दर्गा रोड, परभणी) व सहकारी संशयित आरोपी बहिणाबाई अंधारे (रा. दर्गा रोड, परभणी), रावसाहेब कोळी, अनिल परदेशी (रा. अकलूज, ता. यावल) यांच्याबद्दल तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांनी श्री. फेगडे यांचा विश्वास संपादन करून ६३ हजार रुपये रोख घेऊन येथे विठ्ठल मंदिरामध्ये लग्न लावून देण्याचा बनाव केला. लग्न लावून दिल्यावर संशयित आरोपी सोनाली कुऱ्हाडे ही दिगंबर फेगडे यांच्याकडे नांदण्यास आली. 

अन्‌ ती झाली होती पसार
पाच दिवस राहिल्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधत पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने, पाच हजार रुपये किमतीच्या साड्या आणि तेराशे रुपये किमतीचा मोबाईल फोन घेऊन पळ काढला. त्यामुळे दिगंबर फेगडे यांनी येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यातील सोनाली हिचा तपास करत पोलिसांना त्या नावाची कोणी महिला नसल्याचे आढळून आले. यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पीएसआय जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पोलिस हवालदार भूषण चव्हाण, महिला पोलिस कॉन्स्टेबल ज्योती खराटे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून यातील आरोपींकडून गुन्ह्यातील रक्कम व दागिने हस्तगत केले. 

वारंवार नाव बदलून फसवणूक 
सोनाली कुऱ्हाडे वारंवार तिचे नाव बदलत असून, तिची आतापावेतो झालेल्या तपासात सोनाली कुऱ्हाडे, मंगला पवार, मंगलाबाई उर्फ सोनाली शिंदे अशी नावे तिने सांगितली आहेत. तपासामध्ये तिचे मूळ नाव मंगला आनंदा पवार (रा. आडगाव, ता. यावल) असे निष्पन्न झाले आहे. चिंचोली शाळेतून तिचे बारावीचे शिक्षण झाल्याचा दाखला उपलब्ध झाला आहे. संशयितेने १५ वर्षांपासून आडगाव सोडले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, तिने चिंचोली येथील उमेश पाटील यांच्याशीसुद्धा असाच लग्नाचा बनाव केला होता. त्या वेळी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याबाबत अकरा दिवस पोलिस कोठडीही देण्यात आली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal women change name and fraud marriage