मृत्यूदराची चिंता ः केंद्रीय पथक आज जळगावात 

निखिल सूर्यवंशी  
Friday, 19 June 2020

जळगावमधील गंभीर स्थितीमुळे राज्य सरकारने जिल्हाधिकारी बदलले आहेत. तसेच महिलेच्या मृतदेहाची बाथरूममध्ये आठवडाभर हेळसांड झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व सहकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

धुळे ः खानदेशात "कोरोना'चा विळखा घट्ट होत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कमतरता, प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव, मृतदेहाची हेळसांड आदी विविध कारणांमुळे जळगाव जिल्हा वादग्रस्त ठरला आहे. तेथील स्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारला अखेर विशेष तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला. ते पथक उद्या (ता. 19) सकाळनंतर जळगावला दाखल होईल. कारणांचा शोध घेत तेथील वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी विशेष पथक उपाययोजना सुचवेल. 

तज्ज्ञ पथकात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार आणि महिन्यापासून केंद्राच्या सूचनेनुसार मुंबईत स्थिती नियंत्रणासाठी तळ ठोकून असलेले डॉ. सुनील खापर्डे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुणेस्थित प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक डॉ. एस. डी. अलोने यांच्यासह सहकारी आणि जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष, "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांचा समावेश असेल. 

जळगावला कारणांचा शोध 
जळगावमधील गंभीर स्थितीमुळे राज्य सरकारने जिल्हाधिकारी बदलले आहेत. तसेच महिलेच्या मृतदेहाची बाथरूममध्ये आठवडाभर हेळसांड झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व सहकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 20 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे "कोरोना'मुळे आतापर्यंत तेथे 155 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे सर्वाधिक मृत्यूदराचा "हॉटस्पॉट' म्हणून जळगावकडे पाहिले जात आहे. हा मृत्यूदर राज्यासह मुंबईच्या चारपट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील स्पष्ट केले होते. अशात वादग्रस्त ठरलेल्या जळगावमधील स्थितीची गांभीर्याने दखल घेत, चिंता व्यक्त करत केंद्र सरकारने विशेष तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. पथक जळगावमधील मृत्यूदराबाबत सखोल कारणांचा शोध घेईल. तसेच वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना सुचविणार असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathie news dhule Mortality Concerns Central Squad in Jalgaon today