Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत ‘युती’चा प्रयत्न? भाजपच्या बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Market Committees

Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत ‘युती’चा प्रयत्न? भाजपच्या बैठकीत निर्णय

जळगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या (Market Committee Election) निवडणुकींसाठी इच्छुकांनी अर्ज भरावेत. ‘स्वबळाची’ तयारी करा.

मात्र, सन्मानाने जागावाटप झाल्यास शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करण्यात येईल. (market committee election case of honorable seat distribution bjp alliance with Shiv Sena Shinde group will be made jalgaon news)

त्याबाबत नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) , शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करतील, असा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सोमवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. निवडणुका ‘स्वबळावर’, की शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युती करून लढविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची जिल्हा बैठक जळगावातील औद्यौगिक वसाहतीतील ‘बालाणी लॉन’मध्ये झाली.

भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, तसेच सर्व मंडलाध्यक्ष उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

याबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की काही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सर्वपक्षीय, तर काही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी ‘स्वबळावर’ तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करून निवडणूक लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली.

बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांनी अर्ज भरून ठेवावेत, युतीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मात्र, ज्या ठिकाणी जागा वाटपाबाबत एकमत होणार नाही. त्या ठिकाणी ‘स्वबळावर’ लढण्यात येईल. मात्र, युती करताना सन्मानाने जागावाटप करण्यात येईल. योग्य पद्धतीने जागावाटप होत नसेल, तर त्या ठिकाणी युती करण्यात येणार नाही, असेही स्षष्ट करण्यात आले.

महाजन यांना युतीचे अधिकार

बाजार समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करण्याबाबत पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना संपूर्ण अधिकार पक्षातर्फे देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील गिरीश महाजन यांच्याशी युतीबाबत चर्चा करतील. ते जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असेही एकमताने ठरविण्यात आले.