Market Committee Election : पाचोरा बाजार समितीत तिरंगी लढत रंगणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

pachora Market Committee Entrance
pachora Market Committee Entranceesakal

Market Committee Election : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पाचोरा-भडगाव बाजार समितीची निवडणूक होत आहे. त्यामुळे आमदारांसमोर बाजार समितीवर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे.

महाविकास आघाडीला एकजुटीचा किती फायदा होतो, हे आजमावण्याची संधी आहे, तर भारतीय जनता पक्षाला विषेशत: अमोल शिंदे यांची विधानसभा निवडणुकीसारखीच जादू कायम आहे का, हे पाहता येणार आहे.

त्यामुळे बाजार समितीची निवडणूक अनेक अर्थाने राजकीय वर्चस्व अन् भवितव्य सिद्ध करणारी ठरेल. (Market Committee Election three way fight will take place in Pachora Market Committee jalgaon news)

पाचोरा-भडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या चांगलीच रंगत भरली आहे. शिवसेना, भाजप महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. अजून माघार राहिली आहे. त्यापूर्वीच निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. प्रचारला तिन्ही पॅनलकडून जोरदार सुरवात झाली आहे. त्यातूनच निवडणुकीचा अंदाज स्पष्ट होत आहे.

आमदारांची प्रतिष्ठा पणाला

बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा ही सार्वत्रिक मोठी निवडणूक होत आहे.

ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या उपस्थितीत रॅली निघाली होती. त्यामुळे मतदार आपल्यालाच साथ देतील, असा विश्वास आमदार पाटील यांना आहे. शिवाय सहा महिन्यांत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्यांनी बाजार समितीच्या मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाय हरेश्वर पिंपळगाव गटाचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे व पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांना त्यांनी सोबत घेऊन भाजपसमोर अर्थात अमोल शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्यासोबत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीत जाणे पसंत केले. त्यामुळे आमदार त्यांची उणीवशी भरून काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदारांनी तुल्यबळ अन् नवीन उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे, म्हणून आमदारांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागणार आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकू, असा विश्वास त्यांना आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

pachora Market Committee Entrance
Ramadan Festival : एतेकाफमध्ये महिनाभर 60 मुस्लिम बांधवांची उपासना; रमजान पर्व

महाविकास आघाडीची ‘टेस्ट’

बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी ‘टेस्ट’ असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी एकत्रित मोट बांधत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांचा एकत्रित मेळावाही झाला आहे. तिन्ही पक्ष एकत्रित आल्यावर निवडणुकीत किती फायदा होतो, हे त्यांना आजमावता येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडी कायम ठेवायची का, हेही त्यांना पाहता येणार आहे. तिन्ही पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. बाजार समितीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

भाजपला वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान

पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढत देऊन आमदार किशोर पाटलांसमोर आव्हान उभे केले होते.

त्यानंतर ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांनतर त्यांची मतदारसंघात जादू कायम आहे का, याचे उत्तर देणारी ही निवडणूक आहे. त्यांनी भाजपचे पॅनल रिंगणात उतरविले आहे, पण पाचोऱ्यातील भाजपचा एक गट आमदारांच्या पॅनलसोबत आहे.

त्यामुळे तेही त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यांची भर ते कशा पध्दतीने भरून काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांना त्यांचे काका सतीश शिंदे यांची साथ आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे.

मतदारांची चांदी

बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांचा भाव वाढत असल्याचे चित्र आहे. तिन्ही पॅनल तुल्यबळ असल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. मतदारांचे दिवसभर मोबाईल खणखणत असल्याचे पाहायला मिळत आहे. मेळाव्याच्या अन् प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जात आहे. प्रत्यक्षात मतदानांचा काय भाव चढतो, याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

pachora Market Committee Entrance
Success Story : अंधत्वावर मात करत रेल्वेत मिळविली नोकरी! चंद्रकांत पाटील झाला वर्कशॉप असिस्टंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com