
व्हाट्सॲपवर 1 मेसेज आला अन् 'तिच्या' उपचारासाठी जमले हजारो रुपये
वाकोद (जि. जळगाव) : व्हाट्सॲपच्या (WhatsApp) एका गृपवर मेसेज आला आणि तो सर्वदुर पसरला की समस्येच निराकरण हे अल्पावधित होणार हे नक्की. असाच प्रत्यय जामनेर तालुक्यातील वाकोद येथील एका व्हाट्सॲप गृपच्या कार्याने समोर आला आहे. 'वाकोद एक आदर्श गाव' असे या गृपचे नाव असून नावाप्रमाणे आदर्श उपक्रम राबवून दातृत्वाचा एक नवा आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे.
'तिच्या' दोन्ही किडन्या निकामी
पहूर (ता. जामनेर) येथील आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ६वीत शिकणाऱ्या सारिका योगेश पाटील या विद्यार्थीनीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला पालकांनी दवाखान्यात नेले. तेथे तपासणीअंती तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. सध्या तिच्यावर पाचोरा येथे डायलिसिसची प्रक्रिया सुरु असून घरची परिस्थिति अत्यंत गरिबीची आहे. त्यामुळे तिच्या उपचाराच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असून मदतीचा ओघ सुरूच आहे.
हेही वाचा: वेतनवाढीचा फरक मिळण्यासाठी ‘तारीख पे तारीख’
बातमी गृपवर येताच सरसावले मदतीचे हात
दैनिक 'सकाळ'मधे या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली. हीच बातमी वाकोद येथील 'वाकोद एक आदर्श गाव' या व्हाट्सॲप ग्रुपवर पोचली. त्यातून प्रेरणा घेत येथील सोपान गाढवे या युवकाने ग्रुपवर मदतीचे आवाहन केले असता ग्रुप मधील सभसदांनी तात्काळ मदत देत एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला. व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सोपान गाढवे, राहुल मुळे या युवकांनी आवाहन करत मदतीला चालना दिली. त्यातूनच या मुलीच्या उपचारासाठी ग्रुपमधील युवकांनी मदत फेरी काढली. या सर्वांतून 57 हजार एव्हढी रक्कम जमा झाली. जमा झालेली एकूण रक्कम परिवाराच्या स्वाधिन केली. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकांनी देखील मदत केली होती.
अतिशय गरिबीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाकडे मुलीच्या उपचारासाठी पुरेसा पैसा नसल्याने ते हतबल झाले. परंतू सदर मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात सरसावले असून सध्या सारिकावर पाचोरा येथे विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जमा झालेला मदतनिधी आईकडे सुपूर्द
ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दानशूरांनीही सढळ हाताने मदत केली. या विद्यार्थिनीच्या उपचारासाठी जमा झालेला मदतनिधी तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला. सदर निधी स्विकारतांना आईचे मन भरून आले. याप्रसंगी ग्रुप ॲडमिन सोपान गाढवे, अमोल जोशी, रविंद्र भगत, उमेश भगत, संजय सपकाळ, गणेश पवार, राहुल मुळे, राजू काळे, योगेश जाधव, गणेश काळे, महेंद्र पांढरे, विलास जोशी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सारिकाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.
हेही वाचा: जळगाव : महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचा किस्सा माहितीये?
वाकोद ग्रामपंचायतीनेही केली मदत
वाकोद येथील ग्रुप ग्रामपंचयतीच्या माध्यमातून सारिका हिच्या उपचारासाठी अकरा हजार रुपयांची मदत केली व मुलीच्या उदण्ड आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सरपंच संजय सपकाळे, उपसरपंच रविन्द्र भगत, निलेश भगत, भास्कर पाटील, प्रदिप पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, राजू काळे, योगेश जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते
Web Title: Message On The Whatsapp Group Raised Money For Medical Treatment Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..