सोन्याच्या शुद्धतेबाबत बहुतांश ग्राहकांत उदासीनता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india gold

सोन्याच्या शुद्धतेबाबत बहुतांश ग्राहकांत उदासीनता

जळगाव : सौंदर्य खुलविणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल अशा व्यक्ती विरळच. पण, प्रतितोळ्याला पन्नास हजारांहून अधिक दर असलेल्या महागड्या सोन्याची खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबाबत बहुतांश ग्राहक निरक्षर तर आहेतच. शिवाय, खरेदीच्या वेळी घ्यावयाच्या काळजीबाबतही ते उदासीन असल्याचे लक्षात आले आहे. अलीकडच्या काळात हे चित्र बदलले असून हॉलमार्कसारख्या संकल्पनांमुळे ग्राहक सजग होताहेत. त्यामुळे एवढ्या महागड्या खरेदीच्या वेळी सोन्याच्या शुद्धतेविषयी योग्य ते प्रश्‍न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे, त्यासंबंधीची जनजागृती होणे गरजेचे आहे.

शुद्धतेबाबत ग्राहक उदासीन

५० हजारांहून अधिक दर गेलेल्या सोने खरेदीबाबत ग्राहक मात्र कमालीचे उदासीन आहेत. सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबाबत ज्या गोष्टी सुवर्णपेढीत विचारायला हव्यात, त्या विचारल्या जात नाहीत. सुवर्णपेढीतून २२, २४ अथवा १८ कॅरेट.. जे काही शुद्धतेचे निकष सांगितले जातात, त्यावर विश्‍वास ठेवून सर्रास खरेदी केली जाते. काही लौकिकप्राप्त पेढ्या मात्र प्रत्येक वस्तू, दागिना कॅरेट तपासणीच्या मशीनमध्ये तपासून देतात, पक्के बिल देण्याची पद्धतही आता बऱ्यापैकी रूढ झालीय. मात्र, त्यापलीकडे जाऊन काही बाबी विचारायला हव्यात, त्या ग्राहकांकडून विचारल्या जात नाहीत.

या बाबी महत्त्वाच्या

सर्वसाधारणपणे फॅन्सी दागिने २२ कॅरेटमध्ये घडले जातात. दागिन्यांच्या घडणीच्या स्वरुपांवर त्याची शुद्धता काहीअंशी अवलंबून असते. जेवढा दागिना फॅन्सी तेवढी सोन्याची शुद्धता कमी, असा समज रूढ आहे. प्रत्यक्षात २२ व २४ कॅरेट शुद्ध सोन्यातही फॅन्सी दागिने होऊ शकतात. काही ब्रॅन्डेड कंपन्या असे दागिने तयार करतात. सोने खरेदी व मोड देताना याआधी ९४ : ८८ या स्वरूपाचा निकष लावला जात होता. ती पद्धत आता पूर्ण बदलली आहे. जळगावातील सुवर्णपेढ्यांमध्ये मोडसंबंधीचे निकष वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे सोन्याच्या शुद्धतेनुसार असलेल्या दरात तीन टक्के कमी या स्वरूपात मोडचा भाव दिला जातो. सोन्याची मोड देताना दागिन्याची मजुरीही कमी होते. मात्र, काही दुकानदार त्यात घट दर्शवितात, त्यामुळे ग्राहकांचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान होते. अशावेळी सोने खरेदी करतानाच ते विक्रीच्या वेळी मोड देण्यासाठीची प्रक्रिया व निकष विचारून घेतले पाहिजे. साधारणपणे मोड देताना ग्राहकाचे खूप नुकसान होते.

...ही घ्यावी काळजी

  • सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासून घेतली पाहिजे

  • प्रत्येक दागिना शुद्धता तपासणीच्या मशीनमध्ये स्कॅन करून घेतला पाहिजे

  • दागिन्याची शुद्धता सोल्डरिंगवर (जॉइंटवर) व नॉर्मल भागावर किती, हेदेखील पाहिले पाहिजे

  • दागिन्यात सोन्याच्या व्यतिरिक्त काही घटक असेल (मोती, खडा, हिरा अथवा अन्य धातू) त्याचे वजन वगळता सोन्याच्या वजनाचा टॅगवर उल्लेख आहे का, हेदेखील तपासून घेतले पाहिजे

''सोने खरेदी करताना त्याची शुद्धता ग्राहकाने सर्व पातळीवर तपासून घेतली पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होते, असे नाही. पण, एवढी महागडी वस्तू खरेदी करताना ग्राहक म्हणून प्रत्येकाने सजग राहायला हवे.''

- कुशल गांधी, संचालक, तनिष्क, जळगाव

Web Title: Most Consumers Are Pessimistic About The Purity Of Gold

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaongold