Latest Jalgaon News | शहरात सम, विषम पार्किंग झोन : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon | शहरात सम, विषम पार्किंग झोन : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

जळगाव : शहरातील रस्त्यावरील पार्किंगची होणारी अडचण लक्षात घेऊन सम, विषम तारखांचे पार्किंग झोन करण्यात येतील. त्यासाठी रस्त्यांचे लवकरच सर्व्हेक्षण करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली. (Municipal Commissioner Dr Vidya Gaikwad statement about Even Odd Parking Zones in City Latest Jalgaon News)

शहरात दुचाकी व चारचाकी पार्किंगची गंभीर समस्या आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील दुकानासमोर अस्तव्यस्त वाहनांची पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेत प्राप्त झाल्या आहेत. वाहन पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येणार आहेत.

सम-विषम तारखांना पार्किंग

शहरातील बाजारपेठेत वाहतूक असलेल्या रस्त्यांवर कुठेही चारचाकी वाहन उभे केले जात आहे, तर दुचाकी लावण्यासाठीही जागा नसल्याने अनेक वाहनधारक चक्क कुठेही वाहने लावतात. अगदी महापालिका सतरा मजली इमारतीसमोरील रस्त्यावरही वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंगला शिस्त लावणयासाठी आता शहरात सम- विषम तारखांना रस्त्याच्या बाजूला पार्किंग सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका लवकरच शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे.

पट्टे आखणार

शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यावर पार्किंग सुविधा व्हावी, यासाठी रस्त्यावर पट्टे आखण्यात येतील. त्या पट्टयांच्या आत वाहने लावण्याचे आदेश देण्यात येतील. सम म्हणजे दोन, चार, सहा तारखेला उजव्या बाजूला, तर एक, तीन, पाच या विषम तारखांना रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने पार्किंग करावी लागणार आहेत. तसेच रस्त्यावर पट्टे आखल्यानंतर वाहनधारकांना त्या पट्ट्याच्या आतच वाहने पार्किंग करावी लागणार आहेत. पट्टे आखल्यानंतर त्याच्या बाहेरच्या बाजूला वाहने उभी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

संकुल पार्किंगची फाईल नाही

शहरातील नेहरू चौक ते घाणेकर चौक रस्त्यावरील खासगी व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगच्य प्रश्‍नाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की आपण आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर संकुलाच्या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग जागेतील दुकानाबाबत कोणतीही फाईल नगररचना विभागाकडून आपल्याकडे आलेली नाही. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याचा कोणताही प्रश्‍न नाही. फाईल आपल्याकडे आल्यावर आपण त्या विषयाची माहिती घेऊन निर्णय घेऊ.