Latest Marathi News | मग महापालिकेलाच अडचण का? : नगरसेवक दिलीप पोकळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News | मग महापालिकेलाच अडचण का? : नगरसेवक दिलीप पोकळे

जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असल्याने आचारसंहिता असल्याचे सांगत महापालिकेच्या सर्वच कामांच्या निविदा अडकवून ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग निविदा प्रसिद्ध करीत आहे, मग ही अडचण महापालिकेलाच का आहे, असा सवाल महापालिकेचे नगरसेवक दिलीप पोकळे यांनी उपस्थित केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर डिसेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली. फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती लागू राहणार आहे. याच कारणामुळे जळगाव महापालिकेनेही रस्त्याच्या कामांच्या निविदाही काढणे थांबविले आहे. (Municipal Corporation Correspondent Dilip Pokle ask question to municipal corporation Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : टपाल पार्सल सेवेच्या सिस्टीममधून चीन Out! कोरोना प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा बंद

याबाबत नगरसेवक दिलीप पोकळे यांनी आक्षेप घेतला. आचारसंहिता काळात काम सुरू करू नये. मात्र, या प्रक्रिया पूर्ण करण्यास काय हरकत आहे? सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चोपडा, चुंचाळे, गरताड, कुरवेल भागांतील रस्त्यांच्या कामांच्या निविदा ३ जानेवारीस प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढू शकते.

मग जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यास अडचण का निर्माण केली जात आहे? महापालिका रस्ते कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम पाळते. मग सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते कामांच्या निविदा काढत असेल, तर महापालिकेनेही रस्ते कामांच्या निविदा काढाव्यात.

जळगाव शहरातील नागरिक अगोदरच खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. त्यातच आता आचारसंहितेचे कारणे देत आयुक्तांनी निविदा प्रक्रियाही थांबवली आहे. त्यामुळे आता ही कामे आणखी पुढे ढकलली जातील. रस्त्यांच्या कामाला विलंब होईल. त्यात पुन्हा पावसाळा लागल्यानंतर कामे होणार नाहीत. त्यानंतर थेट महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मग आचारसंहितेमुळे पुन्हा या कामांना खोडा निर्माण होईल. त्यामुळे रस्त्याची कामे होणार कधी? जनतेला खड्ड्यातूनच चालावे लागणार काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप