कस होणार जळगावच! आधीच खड्यांनी नागरीक त्रस्त, त्यात रस्त्याच्या कामास ठेकेदाराची ना 

कैलास शिंदे
Tuesday, 5 January 2021

महापालिकेस शासनाने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीची कामे रखडली आहेत. त्यामुळे निधीचा खर्च न झाल्याने नवीन निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

जळगाव : महापालिकेत रस्ते, पुलाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र ठेकेदार काम सुरू करीत नसल्याचे दिसून आले आहे. शासनाची २५ कोटींच्या निधीची कामे खोळबंली आहेत. त्यामुळे आता या ठेकेदारांना नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

जळगाव शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्यंतरी रस्त्याच्या कामासाठी तसेच काही भागातील नाल्यावरील पुलाच्या कामासाठी महापालिकेतर्फे निधी मंजूर करण्यात आला. त्यासाठी निविदा काढून त्या मंजूरही करण्यात आल्या, तसेच ठेकेदारांना काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठेकेदारांनी अद्यापही आपले काम सुरू केले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेस शासनाने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीची कामे रखडली आहेत. त्यामुळे निधीचा खर्च न झाल्याने नवीन निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

नागरिकांमध्ये नाराजी 
शहरातील रस्त्याच्या कामाची ऑर्डर काढून ठेकदार काम करीत नाही, तसेच कामास नकारही देत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या ठेकेदारांना कामही देता येत नाही. अशा स्थितीत शहरातील अनेक कामे रखडली आहेत. शिवाय रस्त्याची कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

थेट काळ्या यादीत टाकणार 
कामाची ऑर्डर देऊनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारावर आता कडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बांधकाम विभागातर्फे अशा ठेकेदारांची यादी तयार करून त्यांना नोटीस बजावण्यात येईल व त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. 

रस्त्याच्या कामासाठी निधीचे दोन टप्पे 
शहरातील रस्त्याच्या कामासाठी आता निधीचे दोन टप्पे करण्यात येणार आहेत. मार्चपूर्वी रस्त्याच्या कामासाठी ७० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. तर मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यात १५० कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. 

महापालिकेतील रस्त्याच्या कामाचा आपण नुकताच आढावा घेतला आहे. अनेक कामांना मजुरी देऊनही ठेकेदार काम करीत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत आपण शहर अभियंत्यांना पाचारण करून अशा ठेकदारांना नोटीस बजावून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. 
-सुरेश भोळे, 
आमदार, भाजप जळगाव 

महापालिकेच्या मक्तेदारांना कामाचे आदेश देऊनही ते काम करीत नाहीत. त्यामुळे शहरातील कामे रखडली आहेत. या ठेकदारांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
-अरविंद भोसले, 
ाशहर अभियंता 
महापालिका जळगाव 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon bad roads jalgaon work contractors