नविन वर्षात मनपाकडून जळगावकरांसाठी आनंदाची बातमी..थकीत मालमत्ताकरावरील दंडात सवलत 

सचिन जोशी
Wednesday, 6 January 2021

लॉकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळे मालमत्ताकराची थकबाकी भरण्यास धारकांना अडचणी येत आहेत.

जळगाव : कोरोनामुळे आर्थिक स्थिती अडचणीत आल्यानंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांना करावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत देण्याचे महापालिकेने ठरविले आहे. आयुक्त व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, थकबाकीदारांना मालमत्ताकराची रक्कम फेब्रुवारीपर्यंत भरली तरच विविध टप्प्यांनुसार या सवलतीचा लाभ त्यांना मिळू शकणार आहे. 

आवश्य वाचा-  निनावी फोन आला..पत्नीने अत्यंदर्शन घेताच दिसले भयंकर! मग काय मृतदेह स्मशानातून थेट जिल्हा रुग्णालयात

महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी महत्त्वपूर्ण विषयांवर मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा, अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

थकीत करावरील दंडात सूट 
लॉकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळे मालमत्ताकराची थकबाकी भरण्यास धारकांना अडचणी येत आहेत. या विषयावर बैठकीत चर्चा झाली. ॲड. हाडा स्थायी सभापती असताना याबाबत त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यावर थकीत मालमत्ताकरावर आकारण्यात येणाऱ्या दंडावर काही प्रमाणात सूट देण्याचे ठरले. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी ३१ जानेवारीपर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेवर ७५ टक्के, थकबाकी १५ फेब्रुवारीपर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेवर ५० टक्के, तर फेब्रुवारीअखेर भरल्यास २५ टक्के सूट मिळेल. त्यानंतर थकबाकी भरली तर दंडाच्या रकमेत सूट मिळणार नाही. 

अपार्टमेंटमध्ये सिंगल कनेक्शन 
‘अमृत’ योजना कार्यान्वित झाल्यानंतर अपार्टमेंटला नळसंयोजन देण्याबाबतच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. नव्या सोसायटी, अपार्टमेंटमध्ये भुयारी टाक्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी संयोजन देण्याबाबत अडचण नाही. मात्र, जुन्या अपार्टमेंटमध्ये टाक्या नसल्याने त्याठिकाणी नळसंयोजन देण्याबाबत संभ्रम आहे. काही नागरिक त्यासंबंधी विचारणाही करत असल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिले. त्यावर जुन्या अपार्टमेंटमध्ये किती फ्लॅट आहेत, किती जणांचा रहिवासी आहे, त्यानुसार त्यांना अर्धा, पाऊण अथवा एक इंच व्यासाचे संयोजन देण्यात येईल. त्यांनी एकतर भुयारी टाकी बनवावी अन्यथा अपार्टमेंट परिसरात मोठ्या टाक्यांची व्यवस्था करावी, यासाठी त्यांना नोटीस देण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

महत्वाची बातमी- तर जी शिक्षा देणार ती भोगण्यास तयार : गिरीश महाजन

मालमत्तांचे फेरमूल्यांकन 
यासोबतच शहरातील अनेक मालमत्तांचे फेरमूल्यांकन झालेले नाही. ती मोहीम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढू शकेल. शिवाय, ट्रॅफिक गार्डन विकसित करण्यासाठीचा एक कोटी, स्मशानभूमीत बसविल्या जाणाऱ्या गॅसदाहिनीसाठीचे ८० लाख व अन्य असा तीन कोटी ७८ लाखांचा निधी शिल्लक असून, तो मार्चपर्यंत खर्च होत नसल्याने परत जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून तो निधी मार्चनंतरही खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. प्रभाग समिती कार्यालय अधिक कार्यक्षम करावीत, अतिक्रमण विभाग एकतर नटवर सिनेमागृहामागील मनपाच्या जागेत अथवा बालगंधर्व नाट्यगृहालगतच्या कोंडवाड्यात हलवावा, खुल्या भूखंड कराच्या आकारणीबाबत नियोजन करावे, रस्त्यावर पडलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावावी यावरही बैठकीत चर्चा झाली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon exemption overdue property tax penalty