
प्रत्येक प्रभागासाठी मक्तेदार नेमण्यात आले असून त्यांना कार्यादेशही देण्यात आले आहेत.
जळगाव : शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मक्तेदारांना कामाचे कार्यादेश देऊनही काम सुरु झालेले नाही. अमृत योजना व भुयारी गटारांच्या कामामुळे रस्ते दुरुस्ती रखडली असून त्याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला.
आवश्य वाचा- दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; चार रेल्वे गाड्या रद्द -
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागासाठी मनपाने ५० लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. प्रत्येक प्रभागासाठी मक्तेदार नेमण्यात आले असून त्यांना कार्यादेशही देण्यात आले आहेत. अद्यापही अनेक प्रभागात रस्त्यांची डागडुजी सुरू झालेली नसल्याने महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात मनपा अभियंता आणि मक्तेदारांची बैठक घेतली.
बैठकीस नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर चौधरी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले यांच्यासह सर्व अभियंता आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
अशी आहे प्रभागांची स्थिती
रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक १,२ मध्ये काम सोमवारी सुरू होईल. प्रभाग ३,४,५ मध्ये काम सुरू आहे. प्रभाग ६ मध्ये भूमिगत गटारांचे काम सुरू आहे. प्रभाग ७ मध्ये २-३ दिवसात काम सुरू होणार, प्रभाग १०, ११ मध्ये काम सोमवारी सुरू होणार, प्रभाग १२ मध्ये लवकरच काम सुरू होईल, प्रभाग १३, १४, १५, १६ मध्ये अमृत योजना, भूमिगत गटार काम सुरू, प्रभाग १७, १८ मध्ये भूमिगत गटारांचे काम बाकी असून प्रभाग १९ मध्ये अमृत योजनेचे काम बाकी असल्याची माहिती मक्तेदार आणि मनपा अभियंत्यांनी दिली.
वाचा - ग्रामपंचायतने लढवली शक्कल; महिला बचत गटाला कर वसुलीची दिली जबाबदारी, परिणाम दिसला
मक्तेदारांना नोटीस
रस्ते दुरुस्तीबाबत वर्कऑर्डर देऊन १५ दिवस झाले आहेत. ज्या ठिकाणी काम सुरू करता येऊ शकेल परंतु अद्यापही करण्यात आलेले नाही त्या मक्तेदारांना नोटीस बजवावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
संपादन- भूषण श्रीखंडे