Jalgaon News : सावधान! मनपा नगरचना करतेय नकाशात बदल; नालेही गायब! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipality planning to changes in map without inspecting site Jalgaon news

Jalgaon News : सावधान! मनपा नगरचना करतेय नकाशात बदल; नालेही गायब!

जळगाव : तुमचा प्लॉट, घर रस्त्याच्या किंवा नाल्याच्या कडेला असेल, तर तुम्ही ते पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे.

काही जणांचे घर रस्त्याच्या कडेला दाखविले गेले, तर काही जणांच्या घराजवळील नाले (Drains) गायब झाले आहेत. (Municipality planning to changes in map without inspecting site jalgaon news)

महापालिकेतील नगररचना विभागातील अभियंते जागेची कोणतीही पाहणी न करता कायार्यालयात बसूनच बिल्डरांच्या सांगण्यावरून नकाशात बदल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागावर सध्या कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

आशाबाबानगरातील नाला गायब

पिंप्राळ्यातील आशाबाबानगरातील चक्क नालाच गायब झाल्याचे मागे उघडकीस आले होते. याप्रकरणी एका प्लॉटधारकाने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नगररचना विभागाने तब्बल दहा जणांना नोटीस बजावली होती. यात अधिक चौकशी करताना नवीनच प्रकार दिसून आला. नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी मखलाशी केली होती.

परवानगी देताना ज्या भागात नाला होता, तो प्रत्यक्षात कागदावर अभियंत्याने दुसऱ्या भागात वळविला होता आणि प्रत्यक्षात नाल्याच्या ठिकाणी भराव टाकून जागा तयार केली होती. पुढे ज्याच्या प्लॉटमधून नाला कागदावर दाखविला होता.

त्या ठिकाणीही तो दिसून आला नाही. तिसऱ्याच ठिकाणी नाला असल्याचे उघड झाले. याची चौकशी झाली ती नगररचना विभागाच्या अभियंत्याकडूनच. त्याचे पुढे काय झाले ते अद्यापही समजू शकले नाही. प्रत्यक्षात तो ‘नाला’ गायब असून, त्या ठिकाणी फक्त ‘नाली’च शिल्लक आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

इच्छादेवी-डी-मार्ट रस्त्याची कहाणी

शहरातील इच्छादेवी मंदिर ते डी मार्टच्या पुढील भागातील रस्त्याची कहाणी अशीच आहे. या रस्त्यावरील बांधकामाला महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कार्यालयात बसूनच अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. अनेक वर्षे ते उघड झाले नाही.

मात्र, रस्त्याचे काम करताना ते राज्याचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीच्या कामांना मंजुरी देताना अभियंत्यांनी चक्क थेट अडीच मीटर रस्त्याच्या आतपर्यंत परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महापालिकेच्या नगररचना विभागात अभियंत्यांनी घडविला आहे. आताही या रस्त्याचे काम सुरू आहे. साध्या माणसानेही पाहिले, तर त्या ठिकाणी रस्त्यात हे बांधकाम असल्याचे दिसून येईल. मग हेच महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अभियंत्यांना दिसले नाही का, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

मेहरूण नाल्यावरही ले-आऊट

शहरातील मेहरूण भागातील नाल्यावर भिंत बांधून ले-आउट करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत नगरसेवक प्रशांत नाईक यांनी तक्रार केली होती. आता माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनीही तक्रार केली आहे. या भागातील नाल्यावरच भिंत बांधून लेआऊट पाडल्याची तक्रार त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या नगररचना विभागातील अभियंत्यांनीच हा नकाशा केला असून, मूळ नकाशात बदल केल्याचे दिसून आले आहे.

सहाय्यक संचालकांची दिशाभूल

शहरातील इतर भागांतही असेच अनेक प्रकार झाले आहेत. महापालिकेतील अभियंते स्थानिक आहेत. जागेवर जाऊन कोणतीही पाहणी न करता बिल्डर सांगतील, त्याप्रमाणे ते लेआऊट तयार करीत असतात, असा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे नगररचना सहाय्यक संचालक बाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर हे अभियंते चुकीचे अहवाल ठेवत असल्याचेही सांगण्यात येत आहे. नगररचना विभागातील या प्रकाराला आळा घालण्यात यावा, अशी मागणीही आता होत आहे.

अभियंत्याची बदली नाहीच

नगरचना विभागातील काही अभियंत्यांची या ठिकाणाहून बदलीच होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षानुवर्षे ते तेथेच आहेत. त्यामुळे काही बिल्डर व या अभियंत्याचे लांगेबांधे आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी या अभियंत्याची बदली होण्याची गरज आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसणार असल्याचेही मतही आता नगरसेवक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.