MVP Case : दरोड्याच्या कलमांचा पोलिसांकडून गैरवापरचा दावा; ॲड. चव्हाण यांना कोठडी नाकारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adv. Police personnel bringing Praveen Chavan to court.

MVP Case : दरोड्याच्या कलमांचा पोलिसांकडून गैरवापरचा दावा; ॲड. चव्हाण यांना कोठडी नाकारली

जळगाव : मविप्र प्रकरणी दाखल गुन्ह्यात नीलेश भोईटे यांच्या घरावर पुणे पेालिसांनी टाकलेल्या छाप्याप्रकरणी दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात ॲड. प्रवीण चव्हाण यांना रविवारी (ता. २६) अटक

झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी पाच दिवसांच्या पोलिस (Police) कोठडीची मागणी सोमवारी (ता. २७) न्यायालयात केली. (mvp arrest case After Long argument Adv Chavan was denied custody jalgaon news)

दीर्घ युक्तिवादात दिलेली दहा कारणे प्रभावी न ठरल्याने न्यायालयाने पोलिस कोठडी नाकारली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी ॲड. प्रवीण चव्हाण यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यासाठी दहा कारणे न्यायालयात सादर केली.

सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी पोलिस कोठडीच्या आवश्यकतेबाबत माहिती देताना, गुन्ह्यांचे गांभीर्य न्यायालयात मांडले. बचाव पक्षातर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी फिर्यादीतील आरोप खोडून काढत फिर्यादी भोईटे यांच्या घरावरील छाप्यात चाकू प्लांट

करण्यासाठी घरात शिरणे, बाहेर निघताना वेगळ्याच पिशवीतून ‘मविप्र’च्या फायली पळवणे अशक्य असल्याचे न्यायालयास पटवून दिले. फिर्यादी पक्षातर्फे ॲड. मुकेश शिंपी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मांडत संशयितांच्या कोठडीची मागणी लावून धरली.

ॲड. चव्हाणही बोलले...

न्यायालयास विनंती केल्यावर ॲड. चव्हाण यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी फिर्यादी पक्ष आणि सरकार पक्षातर्फे ज्या व्हिडिओ एव्हिडन्सचा दाखला दिला जात आहे, ते एडिटिंग केले असून, व्हिडिओ चित्रणावर वेगळ्याच व्यक्तीचा आवाज लावून तयार केल्याचे केंद्रीय अन्वेषण ब्यूरोतर्फे सुरू असलेल्या तपासात आढळून आले आहे आणि मी, पोलिसांना सहकार्य केले नाही, तर मग तपासाधिकाऱ्यांनी माझा जबाब नोंदवला कसा? असा प्रश्‍न उपस्थित केला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मागील जामिनाचा संदर्भ

गुन्ह्यातील प्रमुख संशयित विजय पाटील, किरण साळुंखे अशा दोघांना दहा दिवसांपूर्वीच (ता. १७ फेब्रुवारी) न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यात सत्र न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत दरोड्याच्या कलमाचा गैरवापर केल्याचे निकालात नमूद केल्याचे ॲड. जळमकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

एकूणच तिन्ही पक्षांचा युक्तिवाद, याच गुन्ह्यात यापूर्वी न्यायालयाने दिलेला अटकपूर्व आणि कायद्याला धरून न्या. खंडारे यांच्या न्यायालयाने पोलिस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीची सुनावणी केली. ॲड. चव्हाण यांना शहर पोलिसांनी जिल्हा कारागृहात रवाना केले. त्यांच्या जामिनावर तपासाधिकाऱ्यांचे म्हणणे प्राप्त झाल्यावर कामकाज होणार आहे.

‘ते’ शाहरुख खानचे वकील नाहीत

कोठडी मिळवण्यासाठी पोलिस देत असलेल्या कारणांत कथित ऑडिओ क्लिपप्रमाणे, ड्रग्जचा उल्लेख असून ॲड. चव्हाण कोठून ड्रग्ज्‌ आणणार होते, याचा तपास होणे आहे. ॲड. चव्हाण सरकारी वकील होते. ते शाहरुख खानचे वकील नव्हते की, त्याच्या मुलाचे वकील नाहीत, असे म्हणत ॲड. जळमकर यांनी प्रवीण चव्हाण यांना विचारणा करताच कोर्ट हॉलमध्ये हास्य तरळले.

टॅग्स :Jalgaonpolicerobbery