‘संवाद’यात्रेतून ‘विसंवादा’चेच दर्शन अधिक 

सचिन जोशी
Monday, 15 February 2021

चाळीसगावच्या मेळाव्यानंतर जयंतराव नंदुरबार जिल्ह्यात गेले. त्याठिकाणी पक्षांतर्गत दोन गटांतील वादाने त्यांचे स्वागत झाले.

जळगावः  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काढलेल्या राज्यव्यापी परिवार संवाद यात्रेची सांगता खानदेशच्या दौऱ्यातून नुकतीच झाली. संघटनेची मोट बांधण्यासाठी कार्यकर्त्यांशी ‘संवाद’ साधण्याचा हा जयंतरावांचा उपक्रम स्तुत्य. पण खानदेशचा विचार करता नंदुरबार, धुळे, साक्री, शिरपूर, भुसावळ असो की जळगाव अशा विविध ठिकाणी पक्षांतर्गत ‘विसंवादा’ने त्यांचे झालेले स्वागत निश्‍चितच नेतृत्वाला विचार करायला लावणारे आहे. 

खरेतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असे छातीठोकपणे सांगत तर आहे. पण तरीही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी विदर्भातून सुरू केलेली राज्यव्यापी परिवार संवादयात्रा आता कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नसताना का काढली? हा प्रश्‍नच आहे. अर्थात तुलनेने ताकद कमी असलेल्या भागात संघटनेची बांधणी करायची झाल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंतरावांचे ते कर्तव्यच म्हणावे लागेल आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे बजावलेही. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, खानदेश हे भाग जयंत पाटलांच्या यात्रेच्या केंद्रस्थानी होते. पक्ष म्हणजे परिवार आणि परिवारातील कार्यकर्त्यांशी संघटनात्मकदृष्ट्या चर्चा व्हावी म्हणून ही ‘परिवार संवाद’ यात्रा, असे तिचा उद्देश. विदर्भ, मराठवाड्यानंतर या यात्रेने खानदेशात प्रवेश केला. चाळीसगावच्या मेळाव्यानंतर जयंतराव नंदुरबार जिल्ह्यात गेले. त्याठिकाणी पक्षांतर्गत दोन गटांतील वादाने त्यांचे स्वागत झाले. या मेळाव्यातच त्यांना ‘पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्यांना रस्ता मोकळा आहे’, असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला. 

पक्षांतर्गत गटबाजी
पक्षांतर्गत गटबाजीचा तीव्र अंक धुळे जिल्ह्यात शिरपूर व धुळे शहरात पाहायला मिळाला. धुळ्यात तर अनिल गोटे व प्रतिस्पर्धी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाटलांच्या साक्षीने चांगलीच धुमश्‍चक्री उडाली. पाटलांच्या संवाद यात्रेचा समारोप होणार होता, त्या जळगाव जिल्ह्यातही भुसावळ व जळगाव शहरात त्यांचे गटबाजीने स्वागत होणे, ही काही संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अनुकूल घटना मुळीच नव्हती. त्यामुळे पाटलांच्या ‘परिवार संवाद’ यात्रेतून ‘विसंवादा’चेच दर्शन अधिक घडले. 

‘फुंकर’ घालण्याचा प्रयत्न
जयंतराव तसे संयमी, मनमिळावू अन्‌ कमालीचे मितभाषी... त्यामुळे गटबाजीचे दर्शन घडलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांची अनोखी हातोटी वापरत या आगीवर तात्पुरती का होईना ‘फुंकर’ घातली खरी. मात्र, त्यांच्या प्रस्थानानंतर गटबाजीतील हे चित्र बदलून पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ होणे कठीण वाटते. असो.. 

माणसं जोडण्याचा प्रयत्न 
नाही म्हणायला, भुसावळातील अर्धेअधिक भाजप नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले, हीच काय ती राष्ट्रवादीसाठी उपलब्धी मानली पाहिजे. दुसरीकडे, पाटलांनी भाजपचे दिवंगत माजी आमदार हरिभाऊ जावळेंच्या भालोद गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, यामागेही आगामी समीकरणं बांधली जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल. या घटनेचा आत्ताच राजकीय अर्थ काढणे योग्य नसले तरी निवडक माणसं जोडण्याचा जयंत पाटलांचा हा प्रयत्न भविष्यात बेरजेच्या राजकारणाचा भाग ठरू शकेल.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp sawad yatra marathi news jalgaon dictric ncp sawad yatra party factionalism appeared