
Jalgaon News : धनादेश अनादरप्रकरणी एकास शिक्षा
पारोळा : येथील रहिवासी सलिमोद्दीन जहिरोद्दीन मुजावर (वय ३९) यांनी मैत्रीपूर्ण संबंधातून दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी नाजीम हबीब पिंजारी (वय ४२) यांना ट्रक विकत घेण्यासाठी २ डिसेंबर २०१८ ला १ लाक ५० हजार रुपये उसनवार देऊन मदत केली होती.
ही रक्कम परत करण्यासाठी आरोपी नाजीम हबीब पिंजारी यांनी १५ जुलै २०१९ ला त्याच्या खात्याचा धनादेश फिर्यादी सलीमोद्दीन मज्जावर यास दिला होता. परंतु आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरीत झालेला होता. (One punished for dishonor of cheque Jalgaon News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
त्यामुळे सलिमोद्दीन मुजावर यांनी पारोळा येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात आरोपीने धनादेशावरील सही व करारनाम्यावरील सही नाकारलेली होती. दोन्ही पक्षांकडून तोंडी व लेखी पुरावे देण्यात आलेत.
तसेच अंतिम युक्तिवादावेळी दोन्ही पक्षांकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिर्णयाचे विविध दाखले देण्यात आलेत.
या खटल्यात फिर्यादीचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून पारोळा न्यायालयातील न्यायदंडाधिकारी एम. एस. काझी यांनी गुरुवारी (ता. २) आरोपीस दोषी ठरवून एक महिना कारावासाची शिक्षा व दोन लाख रुपये दंड सुनावला.
तसेच ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास सहा महिने वाढीव कारावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षातर्फे ॲड. अकिल युसूफ पिंजारी पारोळा यांनी कामकाज पाहिले.