Nashik Crime News : ढकांबेतील घटनेची अखेर उकल; तांबे चोरट्यांनीच टाकला दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhakambe Robbery Case

Nashik Crime News : ढकांबेतील घटनेची अखेर उकल; तांबे चोरट्यांनीच टाकला दरोडा

नाशिक : ढकांबे-मानोरी परिसरातील महावितरण कंपनीच्या रोहित्रांमधील (डीपी) तांब्याच्या पट्ट्या-तारी चोरण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीनेच रतन बोडके यांच्या घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी चौघांना अटक केली असून, दरोड्यातील रोकड व सोन्याचे दागिने असा साडेसतरा लाखांपैकी ४ लाख ६० लाखांचे १६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या टोळीचा मुख्य सूत्रधार नाशिकमधील असून सात जणांच्या या टोळीविरोधात नाशिकसह धुळे, औरंगाबाद, पुणे आणि मध्यप्रदेशातही दरोडा, जबरी चोरी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Dhakambe Incident Finally Solved Robbery done by tambe thieves Nashik Crime News)

ढकांबे-मानोरी शिवारातील रतन शिवाजी बोडके यांच्या शिवकमल बंगल्यावर १२ नोव्हेंबर २०२२ ला मध्यरात्री संशयित सहा दरोडेखोरांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून साडेआठ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा १७ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरून नेत दरोडा टाकला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त होत होता. या गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलीसांसह स्थानिक गुन्हेशाखेचे पथक करीत होते.

पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषण व गुप्त माहितीच्या आधारे संशयित नौशाद आलम फजल शेख (२५, रा. पंचशीलनगर झोपडपट्टी, नाशिक-पुणा रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने ढकांबेतील बोडके यांच्या बंगल्यावरील दरोड्याची कबुली दिली. यासाठी नाशिक आणि मध्यप्रदेशातील साथीदारांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित नौशादसह रेहमान फजल शेख (रा. राहुलनगर, जेलरोड), इरशाद नईम शेख (रा. संजेरी रोहाऊस, राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयाशेजारी, जेलरोड), लखम बाबूलाल कुंडलिया यांना अटक करण्यात आली आहे. रवी उर्फ लालू दिवालाल फुलेरी, इकबाल खान फारून खान (सर्व रा. रसुलपूर, देवास, जि.देवास, मध्यप्रदेश), भुरा उर्फ पवन रतन फुलेरी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांचा या गुन्ह्यात सहभाग होता.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, दिंडोरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक नाना शिरोळे, रवींद्र वानखेडे, हवालदार नवनाथ सानप, जालिंदर खराटे, विश्‍वनाथ कराड, सुशांत मरकड, नाना पानसरे, धनंजय शिलावट, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, किशोर सानप, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने बजावली. या पथकाला अधीक्षक शहजी उपाम यांनी २५ हजार रुपयांची बक्षीसी जाहीर केली. दरम्यान संशयितांच्या चौकशीतून आणखीही गुन्हे उकल होण्याची शक्यता अधीक्षक उमाप यांनी व्यक्त केली आहे.

रोहित्राच्या शोधात पोहोचले बंगल्यांपर्यंत

संशयितांची टोळी ही ग्रामीण भागातील महावितरण कंपनीचे रोहित्रे हेरून त्यातील तांब्याच्या पट्टया व तारा चोरायचे. त्यावेळीही संशयितांची टोळी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर व दुचाकींवरून ढकांबे-मानोरी परिसरातील रोहित्र (डीपी) शोधत होते. त्याचवेळी त्यांना बोडके यांचा बंगला नजरेस पडला. बंगल्याच्या आसपास कोणतीही वस्ती नसल्याने त्यांनी बोडके यांच्या शिवकमल बंगल्यावर दरोडा टाकला. यावेळी संशयितांचा बंगल्यात तब्बल दीड-दोन तास वावर होता. नी रोकड व दागदागिने चोरलेच, शिवाय स्वयंपाक घरात जाऊन रात्रीचा उरलेला स्वयंपाक आणि दिवाळीच्या फराळावरही ताव मारला होता.

तिघांना पुण्याच्या कारागृहात घेतले ताब्यात

गुन्ह्यातील रेहमान फजल शेख (रा. राहुलनगर, जेलरोड), इरशाद नईम शेख (रा. संजेरी रोहाऊस, राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयाशेजारी, जेलरोड), लखम बाबुलाल कुंडलिया हे तिघे पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडूनच गुन्ह्यातील चोरीचे १६ तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.