स्वस्तात वस्तूचा फंडा, अन् ५१ लाखांचा गंडा

चंद्रकांत चौधरी
Tuesday, 22 December 2020

स्वस्तात वस्तू मिळवून देण्याचे आमिष दाखवत गावातीलच व्यावसायिकांची ५१ लाख ५३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

पाचोरा : ‘दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये’ या उक्तीची प्रचीती कुऱ्हाड खुर्द येथील एका व्यक्तीने दोन जणांच्या केलेल्या फसवणुकीच्या प्रकारातून दिसून आला आहे. या ठगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आवश्य वाचा- वृध्दापकाळात आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा होणार कारवाई; या समाजाने घेतला निर्णय -
 

 

या ठगाने स्वस्तात वस्तू मिळवून देण्याचे आमिष दाखवत गावातीलच व्यावसायिकांची ५१ लाख ५३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.आणखी काही जणांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिस व्यक्त करीत आहेत. 

 

असा घडला प्रकार...

कुऱ्हाड खुर्द (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी व सध्या जानोरी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथे वास्तव्यास असलेल्या भारत तुळशीराम मालकर (वय ३३) याने कुऱ्हाड येथील पवन पाटील या व्यावसायिकास ३० लाख रुपये किमतीचे जेसीबी मी २५ लाख रुपयांत मिळवून देतो, असे आमिष दाखवत व त्यांचा विश्वास संपादन करत सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. परंतु जेसीबी अथवा घेतलेली रक्कम परत केली नाही. यासोबतच शिवप्रसाद पाटील यांच्याकडून पाच लाख ५० रुपये, आरिफ सुलतान यांच्याकडून पाच लाख सहा हजार रुपये, प्रदीप महाजन यांच्याकडून चार लाख १२ हजार ५०० रुपये, प्रवीण महाजन यांच्याकडून एक लाख ५० हजार रुपये, दीपक तेली यांच्याकडून सात लाख रुपये, संदीप ठाकरे यांच्याकडून तीन लाख ३५ हजार रुपये असा एकूण ५१ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा गंडा विविध वस्तू स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पवन पाटील यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी भारत मालकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

महत्वाची बातमी- गिरीश महाजनांविषयी सिडी, पॅनड्राईव्ह; म्हणाले ' ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है !
 

अनेकांना फसविल्याची शक्यता 
अशाच प्रकारातून आणखी काही जणांची फसवणूक मालकर याने केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रसिंग पाटील, हवालदार रणजित पाटील, रवींद्रसिंग पाटील, शिवनारायण देशमुख, अरुण राजपूत, संभाजी सरोदे, संदीप पाटील तपास करीत आहेत. अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कायटे यांनी केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online robay news marathi jalgaon pachora merchant fraud