Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

जळगाव : जिल्ह्यातील दोन धाम यात्रेला गेलेली ट्रॅव्हल बस (जीजे ०५, बीएक्स ३४३८) ओडिसा बॉर्डरजवळील सोहला गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. बसला सिमेंटच्या गोण्या (Sacks) भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. (Pilgrim bus was hit from behind by truck full of cement sack accident near Odisha border jalgaon news)

या अपघातात ४९ भाविक होते. जळगावमधील एका प्रवासी महिलेला दुखापत झाली, इतर सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

जळगाव येथून गुजरात पासिंग असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्सद्वारे आसाम, नेपाळ, गंगासागर, जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ४९ भाविक गेले होते. त्या बसला मध्यरात्री अपघात झाला आहे.

भाविकांमध्ये नेपानगर येथील ७, औरंगाबादचे ४, पुण्याचे २, मुंबईचे २, सोलापूरचे २, जळगावचे ३१ प्रवासी होते. यापैकी जिल्ह्यातील सर्व यात्रेकरी सुखरूप असून, मंगलाबाई पाटील (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अमन मित्तल व यंत्रणेला माहिती दिली. अपघातग्रस्त नागरिकांना मदत करण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबलपूरचे जिल्हाधिकारी व बारलगढच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व अपघातग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्त नागरिकांना स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवले व किरकोळ जखमींवर उपचार केले.

दोन धाम यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (रा. जळगाव) या रात्रीच संबलपूरला रवाना झाल्या. सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यासाठी रवाना झाले आहेत. माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष : ०२५७-२२१७१९३/२२२३१८० व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ९३७३७८९०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.