
येता पिवळे पाणी, कळवा ‘व्हॉल्व्हमन’ला तत्पर : जळगाव महापालिका
जळगाव : ‘नळाला पिवळे पाणी आल्यास तत्काळ आपल्या भागातील व्हॉल्व्हमनला कळवा’, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील नागरिकांच्या पिवळे व दूषित पाणी येण्याच्या तक्रारी असल्या, तरी महापालिकेच्या पाहणीत ते आढळून आलेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने ‘व्हॉल्व्हमन’च्या माध्यमातून तक्रारी प्राप्त करून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अनेक भागांत नळाला येणाऱ्या दूषित व पिवळ्या पाण्याबाबत नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे अनेकांना पोटदुखी, उलट्या व मळमळीचा त्रास होत आहे. शहरातील अनेक भागांतील डॉक्टरांकडे या तक्रारीचे रुग्णही वाढले आहेत. या समस्येचे निराकरण अद्याप झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेतर्फेही या तक्रारीचे निराकरण करण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की नागरिकांच्य तक्रारीवरून महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्रापासून, तर नळाला येणाऱ्या पाण्याच्या सर्व चाचण्या केल्या आहेत. जळगाव जिल्हा प्रयोगशाळेत त्या तपासूनही घेण्यात आल्या आहेत. मात्र, कुठेही पाणी दोषयुक्त असल्याचे आढळून आले नाही.
हेही वाचा: नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख
जलवाहिन्यांची तपासणी
नागरिकांच्या तक्रारीमुळे महापालिकेतर्फे जलवाहिन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सांगितले, की शहरात कुठे जलवाहिनी फुटली आहे काय, याचीही तपासणी विभागातर्फे करण्यात आली आहे. मात्र, तेही आढळून आलेले नाही.
पाण्याचे नमुनेही चांगले
शहरातील नागरिकांच्या तक्रारीबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, की ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्या भागात प्रत्यक्ष जाऊन पाण्याचे नमुने घेण्यात आले. तसेच पाणीपुरवठा सुरू असताना पाण्याची पाहणी करण्यात आली. तेथेही पाणी चांगले येत असल्याचे आढळून आले आहे.
‘व्हॉल्व्हमन’कडून पाहणी
शहरात ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्या भागातील ‘व्हॉल्व्हमन’कडे पाहणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सांगितले, की पाणीपुरवठा झाल्यानंतर व्हॅाल्व्हमनने त्या परिसरातील नागरिकांकडून पाणी कसे येत आहे, याची माहिती घ्यायची. दूषित पाणी येत असेल, तर ‘व्हॉल्व्हमन’ने तातडीने त्याचे फोटो घेऊन ते अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकायचे. अधिकारी तातडीने त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील, तसेच पाण्याचे नमुने घेतील आणि परिसरातील जलवाहिनी फुटली आहे काय, याची पाहणीही करतील. त्यामुळे आता ज्या भागात दूषित पाणी येईल, त्या भागातील नागरिकांनी तत्काळ व्हॉल्व्हमनला कळवावे. ते त्या पाण्याची तक्रार अधिकाऱ्यांना देतील आणि त्या तक्ररीचे निराकरण करण्यात येईल.
हेही वाचा: Jalgaon : घराच्या खिडकीतून मोबाईल लंपास
''पिवळ्या पाण्याच्या नागरिकांच्या तक्रारीबाबत महापालिका गंभीर आहे. त्याची दखल घेण्यात येत आहे. अनेक भागांत पाण्याच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेतूनही त्यांचा अहवाल चांगला आहे. तरीही ज्या भागात पिवळे पाणी येत असेल, तर त्या भागातील नागरिकांनी ‘व्हॉल्व्हमन’ला कळवावे. ते त्या पाण्याचे फोटो घेऊन आम्हाला कळवतील. त्या ठिकाणी अधिकारी येऊन त्याची तपासणी करतील व तक्रारीचे निवारण करतील.'' - संजय नेमाडे, पाणीपुरवठा अभियंता, महापालिका
Web Title: Planning Of Jalgaon Municipal Corporation For Redressal Of Water Problems
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..