नाथाभाऊंना थांबविण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले ! त्यांनी पक्ष सोडणे हे आमच्यासाठी दुःखदायक 

सचिन जोशी
Wednesday, 13 January 2021

पक्ष सोडू नये यासाठी आपण व्यक्तिश: त्यांच्याशी चर्चा केली. पक्षीय पातळीवरही काही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा, थांबविण्याचा प्रयत्न केला.

जळगाव : गेल्या ४६ वर्षांतील आपल्या सार्वजनिक जीवनात सध्याचे राज्यातील आघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय सरकार असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केली. महाराष्ट्राच्या भाजप उभारणीत नाथाभाऊंचे योगदान नाकारण्यासारखे नाहीच. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडणे हे निश्‍चितच त्यांच्यासह आमच्यासाठीही दु:खदायक आहे. मात्र, त्यांना थांबविण्याचे पक्षीय पातळीवर तसेच आपण व्यक्तिश: प्रयत्न केलेत, असा दावाही त्यांनी केला. 

आवश्य वाचा- ओव्हरटेक करतांना अचानक समोर आला डिव्हायडर; पण दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण
 

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माधव भंडारी यांच्याशी आज सकाळी ते मुंबईला रवाना होण्यापूर्वी संवाद साधला असता त्यांनी राज्यातील आघाडी सरकारचा कारभार, ईडीची कारवाई त्याबाबत होणारे आरोप, खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय अशा विविध विषयांवर बातचीत केली. 

निष्क्रिीय राज्य सरकार 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोलताना श्री. भंडारी म्हणाले, या सरकारचा कारभार खरोखर सुरु आहे का? आपल्या आजपर्यंतच्या साडेचार दशकातील सावर्जनिक जीवनात अनेक पक्षांची सरकारे पाहिलीत, पण सध्याचे राज्य सरकार यात सर्वाधिक निष्क्रिय आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळातील योजना, प्रकल्प व आदेशांना स्थगिती देण्यापलीकडे या सरकारचे काम काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

ईडी स्वतंत्र यंत्रणा 
राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीच्या आडून त्रास दिला जात असल्याचा आरोप होत असतो, त्याकडे कसे बघता? या प्रश्‍नावर उत्तरताना ते म्हणाले, ‘ईडी’ ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती कुणाच्या इशाऱ्यावर चालण्याचे काही कारणच नाही. ज्याठिकाणी काही चुकीचे घडले असेल त्या प्रकरणात चौकशी करण्याचा या यंत्रणेला पूर्ण अधिकार आहे. चौकशीतून जे काय तथ्य बाहेर यायचे ते येते, अनेकदा नोटीस बजावूनही संबंधितावर कारवाई करण्यासारखे काही नसते, अशीही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे ईडीबाबत शंका घेणे हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे. 

त्यावेळी नाथाभाऊंशी बोललो 
आपण पक्ष सोडावा अशी पक्षातूनच व्यवस्था झाल्याच्या एकनाथराव खडसेंच्या (Eknath Khadse) विधानाबद्दल छेडले असता भंडारी म्हणाले, मुंबईत प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी आपण स्वत: नाथाभाऊंशी बोललो, त्यानुसार ते बैठकीस ऑनलाइन पद्धतीने हजरही झाले. पक्ष सोडू नये यासाठी आपण व्यक्तिश: त्यांच्याशी चर्चा केली. पक्षीय पातळीवरही काही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा, थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची काय अडचण होती माहीत नाही.. अखेर त्यांनी पक्ष सोडला. आज ते ज्या पक्षात आहेत, तेथे ते खूश असतील असे वाटत नाही. 

आवर्जून वाचा- उसनवारीचे पैसे मिळाले; बँकेच्या अकाउंटमध्ये टाकणार तोच पैसे गायब ! 

 

संत मुक्ताईचा अभ्यास करतोय.. 
दोन वर्षांपूर्वी जळगावला आलो होतो, त्यावेळीही मुक्ताईचे दर्शन घ्यायचे राहिले. म्हणून या वेळी आवर्जून मुक्ताईच्या समाधीस्थळी गेलो व दर्शन घेतले. पक्षाच्या खासदार रक्षा खडसेंचीही (Raksha Khadse) भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय मुळीच नव्हती. संत मुक्ताबाई हा आपल्या श्रद्धेचा आणि अभ्यासाचाही विषय आहे. मुक्ताईवर पुस्तक लिहिण्याचे विचाराधीन आहे, त्यासाठीही या स्थळी भेट देणे आवश्‍यक होते. सध्या माहिती संकलित करतोय, लवकरच पुस्तक लिहायला घेईन, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news jalgaon bjp lider Madhav Bhandari Eknath Khadse