धनंजय मुंडे प्रकरणाचे राजकारण केले जातेय !

कैलास शिंदे
Saturday, 16 January 2021

एखादा माणूस सर्व माहिती देत असेल, तर तुम्ही त्याला चोर ठरविणार काय? आणि जर मुंडे यांना लपवायचेच असते, तर त्यांनी स्वत: वक्तव्य करून जनतेला माहिती दिलीच नसती.

जळगाव : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्वत: जाहीर केले आहे, की मला ‘ती’ दोन अपत्य आहेत, आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. मला तरी वाटते, की ते निर्दोष आहेत, याप्रकरणी निश्‍चितच राजकारण केले जात आहे. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तसेच शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 
 

आवश्य वाचा- एकटा रडत बसलेला पाहून प्रवाशांना आली शंका; पोलीस आले आणि लावला शोध !

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की धनंजय मुंडे यांची राजकारणात तीस वर्षांची तपस्या आहे, त्यांनी आपल्या बाबतीत काहीही न लपवता जाहीर केले आहे. त्यांनी स्वत: सर्व माहिती दिली आहे. जर एखादा माणूस सर्व माहिती देत असेल, तर तुम्ही त्याला चोर ठरविणार काय? आणि जर मुंडे यांना लपवायचेच असते, तर त्यांनी स्वत: वक्तव्य करून जनतेला माहिती दिलीच नसती. तसेच न्यायालयातही त्यांची लढाई सुरू आहे.

विनाकारण राजकारण नको

त्यामुळे मुंडे यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांची तीस वर्षांची राजकीय तपस्या उद्ध्वस्त करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर ती चूक आहे. विनाकारण कोणाचाही बळी घ्यायचा, हे बरोबर नाही.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news jalgaon shiv sena minister gulabrao patil dhananjay munde case deliberate politics