esakal | अपात्रतेच्या भीतीपोटीच ‘त्या’ नगरसेवकांनी केले पक्षांतर
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

अपात्रतेच्या भीतीपोटीच ‘त्या’ नगरसेवकांनी केले पक्षांतर

sakal_logo
By
दिपक चौधरी
मुक्ताईनगर : येथील नगरपंचायतीत भारतीय जनता (BJP) पक्षाचे १३ आणि एक अपक्ष असे १४ संख्याबळ आहे. यापैकी आज दहा नगरसेवकांनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र भाजपचे चार व एक अपक्ष असे पाच नगरसेवकच (Corporator) शिवसेनेत गेले आहे. त्यात भाजपची एक नगरसेविका चार अपत्ये असल्याने अपात्र झाली आहे, तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याने भीतीपोटी ते गेले आहे. तसेच त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही,अशी खात्री संबंधितांनी दिल्यामुळेच त्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचेही माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (eknath khadse said fearing disqualification action corporators shiv sena join)

हेही वाचा: खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !

येथील भाजपच्या काही नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर प्रसारित झाल्या. त्यानंतर खडसे यांनी खडसे फार्म हाऊसवर सायंकाळी तत्काळ पत्रकार परिषद घेतली. आपल्यासोबत आता नऊ नगरसेवक हजर असल्याची पुष्ठीही या वेळी श्री. खडसे यांनी दिली. श्री. खडसे म्हणाले, की मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणारे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी चार नगरसेवक भाजपचे असून, एक अपक्ष आहे. इतकेच नव्हे, तर त्या चार भाजपच्या नगरसेवकांपैकी एक नगरसेविका अपात्र झाली असून, उर्वरित तीन भाजपचे नगरसेवक अतिक्रमण केल्यामुळे अपात्र होणार आहेत. त्याची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक जूनला होणार आहे. इतकेच नव्हे, तर हे नगरसेवक नगराध्यक्षांकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. त्यासोबतच एका नगरसेविकेच्या पतीने सणासाठी आपल्याकडून दोन लाख रुपये घेतले असल्याची माहितीही खडसे यांनी दिली.

मी राष्ट्रवादीतच आहे..

अपात्र होण्याच्या भीतीने व त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचविण्याची खात्री संबंधितांनी दिल्यामुळेच त्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर मी राष्ट्रवादीतच असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाहीत.