‘मिठाचा खडा’ नव्हे, राजकीय वर्चस्वाचा संघर्षच..!

माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वादाला अनेक वर्षांची परंपरा आहे.
Eknathrao Khadse - Chandrakant Patil
Eknathrao Khadse - Chandrakant Patilesakal

माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) व आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील राजकीय वादाला अनेक वर्षांची परंपरा आहे. पालकमंत्री गुलाबभाऊंनी या वादाला ‘मविआत मिठाच्या खड्या’ची उपमा दिली असली तरी.. या लढाईतून ना सरकारवर परिणाम होणार, ना प्रयत्न करून या दोघांत दिलजमाई होणार.. वाद अनेकदा किरकोळ कारणावरून होत असला तरी प्रत्यक्षात हा राजकीय वर्चस्वाचाच संघर्ष आहे..

एकनाथराव खडसेंच नाव जोडले गेल्याने जळगाव जिल्हा, खानदेशातच नव्हे तर राज्यात मुक्ताईनगर मतदारसंघ नेहमी चर्चेत राहतो. सलग तीस वर्षे आमदार राहिल्यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना त्यांच्या कन्येच्या रूपात पराभवाला सामोरे जावे लागले, तेव्हापासून ते कमालीचे अस्वस्थ आहेत. भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही लोटलेल्या दीड वर्षात त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकलेले नाही.

Eknathrao Khadse - Chandrakant Patil
ते आले... जमिनीवर बसले... अन्‌ ग्रामस्थांची मने जिंकली !

असे असले तरी मतदारसंघावर वर्चस्वाची पकड ढिली होऊ द्यायची नाही म्हणून खडसे नेहमीच प्रयत्नशील असतात. सर्वपक्षीय पाठिंबा मिळवून निवडून आलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांच्या विरोधात खडसे कन्या ॲड. रोहिणी यांनीही त्या निवडणुकीत ५५ हजारांवर मते घेतल्याचे दुर्लक्षित करुन चालणार नाही, म्हणून त्यादेखील मतदारसंघात सक्रिय असतात, किंबहुना त्यांना सक्रिय राहणे क्रमप्राप्त ठरते. आणि त्यातूनच राजकीय वर्चस्व राखण्यासाठी म्हणून कुरघोड्यांचे राजकारणही करावे लागते.. तो नियमित राजकारणाचा भाग ठरत असतो.

दुसरीकडे एकदा आमदारकी मिळाली, ती आता पुन्हा जाऊ द्यायची नाही म्हणून चंद्रकांत पाटीलही त्यांच्या ‘स्टाईल’ने वाटचाल करताना दिसतांय. खडसेंना जशास तसे उत्तर देण्याची क्षमताही ते दाखवितात..

सध्या मुक्ताईनगरात खडसे आणि चंद्रकांत पाटलांमधील हा संघर्ष त्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचाच भाग आहे. या लढाईतूनच रोहिणी खडसेंच्या वाहनावरील हल्ला, त्यात शिवसेना कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे.. पण, अद्यापही कारवाई न होणे.. मतदारसंघातील विकासकामे, योजनांसाठी निधी आणणे, निधी कुणी आणला तर प्रतिस्पर्ध्याने त्यात आडकाठी निर्माण करणे.. असे प्रकार चालतात.

अर्थातच, हे वाद खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या व आमदारांकडून शिवसेना नेतृत्वाकडे जात असणारच. पण, या दोन्ही पक्षांचे शीर्ष नेतृत्व ‘तो पारंपरिक राजकीय संघर्ष’ असल्याचे सांगत त्याकडे कानाडोळा करतेय.. कारण, शिवसेना- राष्ट्रवादीतील अशा प्रकारचा संघर्ष केवळ मुक्ताईनगरमध्येच आहे, असे नाही तर ते राज्यातील सार्वत्रिक चित्र आहे.. तो कितीही वाढला, ताणला गेला तर सरकारवर त्याचा यत्किंचीतही परिणाम होणार नाही.

Eknathrao Khadse - Chandrakant Patil
शिवाजीनगर पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या शुभारंभापासूनच वाद सुरू

त्यामुळे गुलाबभाऊंनी ‘खडसे प्रेमा’पोटी या वादाला सरकारमधील ‘मिठाच्या खड्या’ची उपमा दिली तरी, ती एक राजकीय स्टेटमेंट यापलीकडे काहीच नाही. खडसेंच्या सुदैवाने त्यांना येणाऱ्या काळात विधिमंडळाचे सदस्यत्व मिळालेच तर हा संघर्ष आणखीच वाढेल, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com