खासगी, स्कूल बससह सातशेवर वाहने उपलब्ध | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी, स्कूल बससह सातशेवर वाहने उपलब्ध

जळगाव : खासगी, स्कूल बससह सातशेवर वाहने उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप १५ दिवसांपासून सुरू असून, परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातून खासगी, स्कूल बस व अन्य अशी सुमारे सातशेवर वाहने प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप ८ नोव्हेंबरपासून सुरू आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

हेही वाचा: अकोला : पोलिस अधीक्षकांकडून रात्री संचारबंदीची निगराणी!

खासगी बस, वाहनांना मान्यता

खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बस उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची बस स्थानकनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच ठिकाणांहून सुविधा यात प्रामुख्याने जळगाव शहर जुने व नवे बसस्थानक, भुसावळ बसस्थानक, चाळीसगाव बसस्थानक व अमळनेर बसस्थानक येथे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व बसस्थानकांवर प्रवाशांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणचे स्कूल बस वाहतूकदार, खासगी बस वाहतूकदार किंवा मालवाहू वाहतूकदारांशी संपर्क साधत वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सातशेवर वाहनांची सोय

जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून आजपर्यंत एकूण ७४ खासगी बस, १२ स्कूल बस व ५९२ इतर प्रवासी वाहने प्रवाशांच्या गरजेनुसार या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत पुरविण्यात आली आहेत. संपकाळात प्रवाशांच्या सोयीसाठी या कार्यालयात स्थापन नियंत्रण कक्षाशी (०२५७-२२६१८१९) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांनी केले आहे.

loading image
go to top