Latest Marathi News| निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्वला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirankumar bakale

Jalgaon : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्वला विरोध

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी (ता. २१) तपास यंत्रणेकडून न्यायालयात खुलासा सादर करण्यात आला आहे. बकालेंच्या जामिनाला त्यांनी तीव्र विरोध करत गुन्ह्यांचे गांभीर्य न्यायालयात मांडले असून, अटकपूर्वच्या अर्जावर अंतिम युक्तिवाद शुक्रवारी (ता.२३) होणार आहे. (Protest against pre arrest bail of suspended Inspector kiran kumar Bakale Jalgaon News)

स्थानिक गुन्हेशाखेत कार्यरत तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हजेरी मास्तर अशोक महाजन आणि बकाले यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप महाराष्ट्रात व्हायरल होऊन या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने पोलिसांचा खुलासा मागविला होता. त्यानुसार बुधवारी पोलिसांतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी न्यायालयात खुलासा सादर केला असून, अटकपूर्व जामिनाला तीव्र विरेाध केला आहे.

महाजनचाही तपास होणार

गुन्ह्यातील ऑडिओ क्लीप व्हायरल करणारा सहाय्यक फौजदार अशोक महाजन याने गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत त्याचा आक्षेपार्ह संभाषण असलेला मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार दिली होती. ही तक्रार खोटी असून, गुन्ह्यातील महत्त्वाचा भौतिक व तांत्रिक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे, तसेच त्याचा गुन्ह्यातील सहभाग तपासणे बाकी आहे. संशयिताला अटक केल्याशिवाय तपास होणे शक्य नाही, अशा मुद्द्यांना मांडण्यात आले.

बकाले बेपत्ता

ऑडिओ क्लीप व्हायरल होण्याच्या दिवसापासून बकाले यांनी जळगाव सोडले. तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद आहे. एवढेच नव्हे, तर निलंबन काळात पोलिस उपधीक्षक गृह, (नाशिक ग्रामीण) यांच्याकडे हजर होत नियमित हजेरी देण्याबाबत त्यांना आदेश बजावले असतानाही, ते हजर झालेले नाहीत. त्यांचा हजेरी मास्तर अशोक महाजन याच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Bogus Medical Certificate Case : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

पुरावे नष्ट करण्याची भीती

अद्याप गुनह्याचा तपास प्राथमिक स्वरूपात आहे. त्यामुळे बकाले यांना अटक करणे गरजेचे असून, अटक न केल्यास पुरावे नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. साक्षीदार व इतरांना दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करत पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच बकाले पोलिस खात्यातील असल्यामुळे त्यांना मोबाईलबाबत संपूर्ण तांत्रिक माहिती असून, गुन्ह्यातील पुरावे तांत्रिक व क्लीष्ट स्वरूपाचे असल्याने ते नष्ट केले जाऊ शकता. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तपासात अडथळा आणण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

यावर अंतिम सुनावणी शुक्रवारी (ता. २३) होणार आहे. फिर्यादीतर्फे ॲड. गोपाळ जळमकर आणि सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.

आवाजाचे नमुने हवेत..

अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास बकाले आपला मोबाईल हजर करणार नाहीत. परिणामी, मोबाईल जप्त करता येणार नाही, अशी पोलिसांना खात्री असल्यामुळे बकाले यांच्या अटकेची गरज असल्याचे म्हटले आहे. तपासात अशोक महाजनसोबतच बकाले यांच्या आवाजाचे नमुने संकलित करायचे आहेत. त्यासाठी अटक आवश्यक आहे. बकालेंचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास जनमाणसांत असंतोष व प्रक्षोभ निर्माण होऊन पुनश्चः कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

हेही वाचा: B.E., B.Tech., इंटिग्रेटेड अभ्यासक्रम प्रवेशासाठी 4 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

Web Title: Protest Against Pre Arrest Bail Of Suspended Inspector Kiran Kumar Bakale Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrime