
अनारक्षित रेल्वे तिकिटांतून विक्रमी महसूल
भुसावळ - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मे २०२२ या महिन्यात अनारक्षित तिकीट विक्रीतून ११ कोटी २५ लाखांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षी (मे २०२१) हे उत्पन्न केवळ एक कोटी ८२ लाख होते. म्हणजेच यंदा त्यात ५१८ टक्के वाढ करत रेल्वेच्या वाणिज्य विभागाने रेकॉर्डब्रेक महसूल मिळवला.
कोरोना काळात बंद असलेल्या बहुतांश रेल्वे गाड्या आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जनरल तिकीट सुविधा नाही. त्यामुळे मेमू गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. दरम्यान, मेमू, पॅसेंजर गाड्यांचे तिकीट काढण्यासाठी खिडकीवर सकाळपासून रांग लागते. त्यातून गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मे २०२१ मध्ये रेल्वेला अनारक्षित तिकीट विक्रीतून एक कोटी ८२ लाखांचा महसूल मिळाला होता. तो यंदा ११ कोटी २५ लाख एवढा आहे. त्यात ५१८ टक्के वाढ नोंदवली गेली. तर आरक्षित तिकीट विक्रीतून मे २०२१ मध्ये १० कोटी ३२ लाखांची कमाई झाली होती. ती यंदा ४६ कोटी ७५ लाख रुपये आहे. त्यात २५३ टक्के वाढ झाली. यानंतर एप्रिल २०२२ मध्ये हा आकडा ४५ कोटी ६९ लाख एवढा आहे. डीआरएम एस. एस. केडिया, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाने ही कामगिरी केली.
मालवाहतुकीचे उत्पन्न वाढले
प्रवासी वाहतुकीसोबतच रेल्वेचे माल वाहतुकीचे उत्पन्न देखील वाढले आहे. गेल्या वर्षी मे २०२१ मध्ये ४४ कोटी ४९ लाखांचा महसूल मालवाहतुकीने दिला होता. तो यंदाच्या मे महिन्यात ६१ कोटी दोन लाख एवढा आहे. त्यात ३७.१५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
Web Title: Record Revenue From Unreserved Train Tickets
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..