
तीन कर्मचाऱ्यांना आंदोलनात भोवळ; शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना बराच कालावधी होऊनही त्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांकडून सोमवार (ता. ४)पासून निदर्शने व घोषणाबाजी करीत बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनात तीन महसूल कर्मचाऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेने भोवळ आल्याची घटना घडली. उपस्थित कर्मचाऱ्यांना भोवळ आल्याने सावलीत नेले. नंतर घरी पाठविले.
दरम्यान, बुधवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आढावा घेतला. गुरुवारी (ता. ७) सर्व विभागीय आयुक्तांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करून अहवाल मागविला आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन मंजूर करणार आहे. मग विभागीय आयुक्तांशी चर्चा कशाला करायची, असा पवित्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्तांकडे चर्चेला जायचे नाही. गेले तरी तुम्ही मागण्या मान्य करीत असाल तरच बोलणे करा, असे सांगत चर्चा करायची नाही. असे ठरविण्यात आले आहे.
आंदोलनात महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, शिपाई संवर्गातील कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. सर्वच शासकीय कामे ठप्प झाल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाया जात आहेत. जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल वाहनचालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
मे २०२१ अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, महसूल सहाय्यक (लिपिक) रिक्त पदांसाठी तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अव्वल कारकून (वर्ग ३)च्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश परदेशी, कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, भाऊसाहेब नेटके, प्रवीण भिरूड, अतुल जोशी आदींनी संपात सहभाग घेतला आहे.
Web Title: Revenue Employees Strike Three Employees Feels Dizziness Due Heat Wave Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..